पारगाव : बाजारभावाअभावी कोबीचे पीक दिले सोडून | पुढारी

पारगाव : बाजारभावाअभावी कोबीचे पीक दिले सोडून

पारगाव(आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : कोबीचे बाजारभाव घसरल्याने गुंतवलेले भांडवल वसूल होणे दूर, उलट मजुरी, वाहतुकीचा खर्चही अंगावर पडत असल्याने शेतकर्‍यांनी कोबीचे पीक सोडून दिले आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात अनेक शेतामध्ये कोबीचे गड्डे जनावरे खाताना दिसत आहेत. गेली चार महिन्यांपासून कोबीचे बाजारभाव घसरले आहेत.

त्यामुळे पिकासाठी गुंतवलेले भांडवल वसूल होणे कठीण झाले आहे. सध्या कोबीला दहा किलोला वीस ते चाळीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव परवडणारा नाही. यातून मजुरी, बाजारपेठेपर्यंत वाहतुकीचा खर्चदेखील वसूल होत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक उत्पादक शेतकर्‍यांनी कोबीचे पीक सोडून दिले आहे. त्यामुळे अनेक शेतांमध्ये जनावरे चरताना दिसत आहेत.

Back to top button