मंचर : अनोळखी वाटसरू महिलेला नागरिकांची मदत | पुढारी

मंचर : अनोळखी वाटसरू महिलेला नागरिकांची मदत

मंचर(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : एकलहरे  ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाशेजारी 35 वर्षांची अनोळखी महिला शनिवारी रात्री आठच्या सुमारास झोपली होती. तिच्यावर अनुचित प्रसंग येऊ नये यासाठी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेसह पत्रकार व नागरिकांनी तिला मदत करत माणुसकीचे दर्शन घडवले. ग्रामस्थ, पत्रकार व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था प्रतिनिधींनी मंचर पोलिस ठाण्याशी संपर्क करून तिला सुरक्षितपणे पोलिस ठाण्यात पोचविले. सध्या ससून रुग्णालयात महिला उपचार घेत आहे. तिची ओळख पटविण्यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्न करत आहे. पण तिला बोलता येत नसल्याने पोलिसांपुढे अडचणी उभ्या राहिल्या आहेत. ती आंध्र प्रदेशातील असावी, असा अंदाज आहे.

डॉ. सुहास कहडणे, सुशील कहडणे, अनंत तायडे, निखिल तायडे, बाळासाहेब भालेराव, अय्युब शेख, अमोल जाधव यांनी महिलेला रात्री पाहिले. त्यांनी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेशी संपर्क केला. पत्रकार डी.के. वळसे पाटील यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक सतीश होडगर व सहायक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांना दिली. त्यानंतर शर्मिला होले, पूजा गरगोटे- पिंगळे, ठाणे अंमलदार सुदाम घोडे, अविनाश दळवी, हरी नलावडे ताबडतोब महिलेजवळ आले. तिला हाताने खाणाखुणा करून धीर दिला. पाणी, बिस्कीटे व जेवणही दिले.

रविवारी (दि.12) तिला ज्ञानशक्ती विकास वाहिनीच्या अर्चना टेमकर यांनी कपडे दिले. पोलिस नाईक अश्विनी लोखंडे, हवालदार तुकाराम मोरे महिलेसह ससून रुग्णालयात गेले. तेथे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे, डॉ.निशिकांत थोरात यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

नागरिक, संस्था व पत्रकारांनी रात्रीच्या वेळी अनोळखी वाटसरू महिलेला केलेली मदत निश्चितच कौतुकास्पद आहे. महिलेची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

                                                         – सतीश होडगर,
                                                     पोलिस निरीक्षक, मंचर.

Back to top button