उंडवडी : पावसाच्या भीतीने वैरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग | पुढारी

उंडवडी : पावसाच्या भीतीने वैरणीसाठी शेतकर्‍यांची लगबग

उंडवडी; (ता. बारामती) पुढारी वृत्तसेवा : उंडवडी सुपे परिसरातील शेतकरी अवकाळीच्या भीतीने शेतातून कडबा घरी नेण्यासाठी धावपळ करीत आहेत. सध्या ढगाळ वातावरण असून, हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. शेतात काढून ठेवलेला कडबा भिजू नये यासाठी शेतकरी ट्रॅक्टरमधून तो घरी नेत आहेत. उन्हाळ्यात सुका चारा म्हणुन कडबा उपयोगी येतो. ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने सुका चारा जास्त प्रमाणात लागतो. संपूर्ण उन्हाळा पुरेल इतका सुका चारा साठवावा लागतो.

दरम्यान, ज्वारीच्या काढणीस मजूर मिळत नसल्यामुळे रब्बी हंगामात ज्वारीपेक्षा गहू मोठ्या प्रमाणात घेतला जातो. गहू काढणीसाठी हार्वेस्टर मशीनचा वापर केला जातो. मजूर टंचाईवर हार्वेस्टर उपयुक्त ठरत आहे, त्यामुळे शेतकरी ही ज्वारीऐवजी इतर पिके घेऊ लागल्याने कडब्याचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे, त्यामुळे कडब्याच्या किमती वाढत चालल्या आहेत. सध्या कडब्याला शेकडा बावीसशे रुपये बाजारभाव मिळत आहे. उन्हाळ्यात चाराटंचाई निर्माण होते. सुका चारा म्हणून दूध उत्पादक शेतकरी कडबा विकत घेतात. त्यातच अवकाळी पावसाची शक्यता असल्याने कडबा घरी नेण्यासाठी शेतकरी धावपळ करीत असल्याचे विकास मदने यांनी सांगितले.

Back to top button