राष्ट्रीय बाजारासाठी दिवे येथील खासगी जागा घेणार नाही : शिवतारे | पुढारी

राष्ट्रीय बाजारासाठी दिवे येथील खासगी जागा घेणार नाही : शिवतारे

सासवड(पुरंदर); पुढारी वृत्तसेवा :  तालूक्यातील दिवे येथील राष्ट्रीय बाजारासाठी खासगी जागा संपादन करणार असल्याची कुजबुज करून काही लोक आपली राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करीत आहेत; परंतु त्यात कुठलेही तथ्य नाही. एक इंचही खासगी जागा या प्रकल्पासाठी घेतली जाणार नाही, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले आहे.

शिवतारे म्हणाले, विकासाच्या प्रक्रियेला पुरंदरमधील काही लोकांचा कायम विरोध असतो. विमानतळ, महामार्ग, एमआयडीसी, बाजार अशा सर्वच प्रकल्पांना विरोध करणारे हेच लोक तालुक्याचा काय विकास केला, म्हणूनही प्रश्न विचारतात. सामान्य माणसाची ही थट्टा असून, या प्रकल्पांना विरोध करणारे लोक गडगंज आहेत. सामान्य माणसाच्या जीवनात प्रगती होण्याची चिन्हे दिसू लागली की, ते अस्वस्थ होतात. राष्ट्रीय बाजाराला 25 वर्षे लागतील, असाही शोध या लोकांनी लावला आहे.

बाजार समितीच्या अधिकार्‍यांना शब्दात पकडून त्याचाच गवगवा केला जात आहे. नेतृत्व खमके असेल तर अल्पावधीत प्रकल्प पूर्ण होतात, हे आपण गुंजवणीच्या रूपाने अनुभवले आहे. 1993 पासून अडगळीत पडलेला प्रकल्प केवळ दोन वर्षात पूर्ण केला. इच्छाशक्ती असेल तर सगळं होतं, पण नेतृत्व जर नेभळट आणि रडकं असेल तर काहीही होणार नाही, असेही शिवतारे यांनी सांगितले.

Back to top button