तळेगाव ढमढेरे : दरेकरवाडीत रंगले भूमिपूजन नाट्य

तळेगाव ढमढेरे : दरेकरवाडीत रंगले भूमिपूजन नाट्य

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : दरेकरवाडी येथे शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली असताना या कामाचे दोनवेळा भूमिपूजन होऊन तीन वेगवेगळ्या पाट्या लागल्याने भूमिपूजन श्रेयनाट्य चांगलेच रंगले आहे.
दरेकरवाडी (ता. शिरूर) साठी शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आल्याने या कामाचे भूमिपूजन करण्याबाबत ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी चर्चा करून त्याबाबत पाटी लावून गावातील पदाधिकार्‍यांच्या हस्ते भूमिपूजन केले.

मात्र, त्यानंतर पुन्हा काही पदाधिकार्‍यांनी ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांची पाटी काढून टाकत आमदार अशोक पवार यांच्या नावाची पाटी लावून त्याच कामाचे त्याच जागेवर शनिवारी पुन्हा भूमिपूजन केले. एवढेच नाही, तर लावण्यात आलेल्या प्रत्येक फलकामध्ये निधीची रक्कमसुद्धा वेगळी असल्याचे स्पष्ट होत होते. या प्रकाराने गावातील पदाधिकारी संतप्त झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते चंदन सोंडेकर यांच्या उपस्थितीत गावामध्ये निषेध सभा घेत संतप्त भावना व्यक्त केल्या.

या वेळी माजी सरपंच पोपट दरेकर, प्रमिला दरेकर, माजी उपसरपंच हिरामण दरेकर, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ दरेकर, दिलीप दरेकर, दत्तात्रय दरेकर, अशोक दरेकर, अशोक भोसले, संदीप दरेकर, राजेंद्र दरेकर, विकास भोसले, सुनील दरेकर, बाबू हंबीर आदी उपस्थित होते. तर आज रविवार (दि.12 मार्च) रोजी सकाळच्या सुमारास पुन्हा ठरावीक ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाची नवीन पाटी पुन्हा नव्याने लावण्यात आली. त्यामुळे गावातील एकाच विकासकामाचे दोन भूमिपूजन तसेच एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या नावांच्या पाट्या लागल्याचे, तर त्यातील एक पाटी गायब झाल्याचे दिसून आल्याने खळबळ उडाली आहे.

आमदार अधिवेशनात असल्याने पुन्हा भूमिपूजन
गावामध्ये या विकासकामाची सुरुवात ठेकेदारांना करायची होती. मात्र, आमदार अशोक पवार हे अधिवेशनात होते त्यामुळे आम्ही आमच्या पातळीवर भूमिपूजन केले. त्यानंतर आमदार आल्याने त्यांच्या हस्ते भूमिपूजन केले. तसेच आधीची पाटी ठेकेदाराने आणलेली असल्याने त्यावर नावे 'प्रोटोकॉल' नुसार नसल्याने आम्ही पाटी बदलून घेतली,असल्याचे सरपंच विक्रम दरेकर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news