लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या बापाचा दुर्दैवी अंत | पुढारी

लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या बापाचा दुर्दैवी अंत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपल्या लाडक्या लेकीला पोलीस व्हायचं स्वप्न असल्याने लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका पित्यावर काळाने घाला घातला. सुरेश सखाराम गवळी वय 55 असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे. त्यांची मुलगी पोलीस भरतीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करते. पोलीस भरतीची तारीख कळल्यानंतर आपल्या लेकीला सुरेश गवळी आणि त्यांची पत्नी नाशिकहून पुण्याला घेऊन आले.

काल रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम देखील केला. पहाटे दोनच्या दरम्यान मुलीचे ग्राउंड असल्याने मुलीला ग्राउंडवर सोडायला देखील गेले. मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून हे सुरेश गवळी निघाले असताना काळाने त्यांच्यावरती घाला केला, समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबतचा अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अर्जुन नाईकवाडे हे तपास अधिकारी म्हणून काम करत आहेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचा शोध घेत आहेत.

Back to top button