पिंपरी : ‘आरसी’ नंबर नसेल तर धान्यापासून राहाल वंचित

पिंपरी : ‘आरसी’ नंबर नसेल तर धान्यापासून राहाल वंचित

दीपेश सुराणा

पिंपरी : तुम्ही शिधापत्रिकेसाठी बारा अंकी आरसी नंबर घेतला आहे का? हा आरसी नंबर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही धान्यापासून वंचित राहू शकता. जरी, तुम्ही अंत्योदय अन्न योजना किंवा प्राधान्य कुटुंब योजनेचे लाभार्थी असला तरीही. रेशनकार्डधारकांसाठी हा नंबर सक्तीचा करण्यात आला आहे. या योजनेत आत्तापर्यंत शहरातील 1 लाख 18 हजार 390 रेशनकार्डधारकांनी नंबर काढलेला आहे. त्या अंतर्गत 4 लाख 44 हजार 47 इतक्या लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळत आहे.

शहरातील स्वस्त धान्य दुकानांतून धान्य घेण्यासाठी आता शिधापत्रिकेचा 12 अंकी आरसी नंबर बंधनकारक करण्यात आला आहे. पूर्वी रेशनकार्ड दाखविले तरी धान्य मिळत होते. मात्र, सध्या केवळ रेशनकार्ड असून फायदा नाही. तर, रेशनकार्ड असणार्‍या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली असणेदेखील गरजेचे आहे. त्यासाठी निगडी आणि भोसरी येथील शिधापत्रिका कार्यालयात येणार्‍या अर्जांची नोंदणी करुन पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. नोंदणी झालेल्या शिधापत्रिकेला 24 तासांमध्ये 12 अंकी आरसी नंबर दिला जात आहे.

शिधापत्रिका कार्यालयात गर्दी
शिधापत्रिकांचे सन 1999 मध्ये नुतनीकरण करण्यात आले होते. ज्यांनी रेशनकार्डचे नुतनीकरण करुन घेतलेले नाही, त्यांनी ते करुन घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना आवश्यक कागदपत्रे सादर करुन 12 अंकी आरसी नंबर घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुरुवातीला शिधापत्रिकाधारकांनी या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. परंतु, हा नंबर नसल्याने लाभार्थ्यांना धान्य मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेकांनी ऑनलाईन अर्ज करुन हा नंबर काढून घेण्यासाठी नागरिकरांची शिधापत्रिका कार्यालयात गर्दी होत आहे.

कशी होते कार्यवाही
शिधापत्रिकेची झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स आणि आवश्यक असल्यास फोटो दिल्यानंतर शिधापत्रिका कार्यालयाकडून त्याची पडताळणी केली जाते. त्यानंतर ऑनलाईन नोंदणी होते. तसेच, शिधापत्रिकेवर 12 अंकी आरसी नंबर टाकण्यात येत आहे.

कोट्यानुसार धान्य वाटप
शहरातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दरमहा अन्नधान्य वितरण व पुरवठा कार्यालयाच्या वतीने कोटा निश्चित करुन धान्य दिले जाते. त्या कोट्यानुसार धान्य वाटप करण्यात येते. त्यामुळे अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील पात्र ठरणार्‍या रेशनकार्डधारकांना धान्य दिले जाते. तथापि, काही शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याची कार्यवाही परिमंडळ कार्यालयाकडून व्हायला हवी.

आरसी नंबर घेतलेले शिधापत्रिकाधारक
(26 फेब्रुवारी 2023 अखेर)
झोन अंत्योदय अन्न योजना प्राधान्य कुटुंब योजना
कार्डधारक लाभार्थी कार्डधारक लाभार्थी
अ झोन (चिंचवड) 203 827 40815 151122
ज झोन (पिंपरी) 1596 5724 34864 132174
फ झोन (भोसरी) 1990 7855 38922 146345
एकूण 3789 14406 114601 429641

अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील शिधापत्रिकाधारकांनी आवश्यक आरसी नंबर घेणे गरजेचे आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांनी त्यासाठी अर्ज केला आहे, त्यांचा अर्ज व कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर त्यांची नोंदणी करुन त्यांना बारा अंकी आरसी नंबर दिला जातो. ज्यांच्याकडे हा नंबर नाही त्यांनी त्यासाठी अर्ज करुन हा नंबर घ्यायला हवा.

    – दिनेश तावरे, परिमंडळ अधिकारी, शिधापत्रिका कार्यालय, निगडी

शिधापत्रिकांसाठी आरसी नंबर सक्तीचा करण्यात आलेला आहे. हा नंबर नसणार्‍या कार्डधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. हा नंबर नसल्यास तुमचे कार्ड अस्तित्त्वात असतानाही तुम्हाला त्याचा फायदा मिळत नाही.

   – विजय गुप्ता, खजिनदार, ऑल महाराष्ट्र फेअरप्राईज शॉपकिपर्स फेडरेशन

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news