पिंपरी : मनपा निवडणुकीत शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार

पिंपरी : मनपा निवडणुकीत शंभरपेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणणार

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभेची मतदारसंघाची पोटनिवडणूक ही आपल्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम होती. या निवडणूकीत जिथे आपल्याला कमी मतदान झाले आहे, त्याची चाचपणी करुन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करायला हवी. आपण जिंकलो या अविर्भावात राहून चालणार नाही, तर, आपल्याला आगामी पालिका निवडणुकीत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी तयारी करावी लागेल, असा निर्धार रविवारी (दि. 12) भाजपच्या आभार मेळाव्यात
पदाधिकार्‍यांनी केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप यांना मिळालेल्या विजयाबद्दल भाजपच्या वतीने रहाटणी येथे आभार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी हा निर्धार करण्यात आला. खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप, माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर झामाबाई बारणे, माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप, सचिन साठे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे म्हणाले, हिंदुत्ववादी विचारसरणीचे मतदार चिंचवड पोटनिवडणुकीत कमी बाहेर पडले. या निवडणुकीत आपण आणखी 15 हजार मतांचे मताधिक्य घेऊ शकलो असतो. पुढील आगामी निवडणुकांमध्ये जर आपण मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यात कमी पडलो तर विरोधकांचे मनोबल वाढेल.

त्यामुळे पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेवुन आपल्याला नियोजन करावे लागणार आहे.
भेगडे म्हणाले की, चिंचवड मतदारसंघात घड्याळ बंद करण्याचे काम कार्यकर्त्यांनी केले आहे. ही निवडणूक आगामी महापालिका निवडणुकीसाठी रंगीत तालीम आहे. मनपा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणण्याची खुणगाठ आपल्याला बांधावी लागेल. राज्याच्या मंत्रीमंडळातही पिंपरी-चिंचवडला स्थान मिळवून द्यावे लागणार आहे.

खापरे म्हणाल्या की,चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आपण कोणत्या प्रभागात कमी पडलो, याचे विश्लेषण करायला हवे. त्यानुसार आपल्याला प्रभागत स्तरावर तयारी करावी लागणार आहे. अधिवेशन संपल्यानंतर कोणत्याही क्षणी महापालिका निवडणुका लागू शकतात. महापालिका निवडणुकखीत शंभरपेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे ध्येय आपल्याला ठेवावे लागणार आहे.

एकनाथ पवार म्हणाले की, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत दीड लाख मतदारांचा पल्ला आपल्याला गाठता आला नाही. त्यामुळे त्याबाबत आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण जिंकलो, या अविर्भावात राहून चालणार नाही. तर, आगामी निवडणुकांसाठी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही अल्पसंतुष्ट लोकांनी जगताप कुटुंबीय फोडण्याचे काम केले. मात्र, आम्ही एकत्र राहिलो, असे शंकर जगताप यांनी नमूद केले.

अनोख्या पद्धतीने मानले आभार
आमदार महेश लांडगे यांनी या़ वेळी आपण कोणत्याही सूचना, मार्गदर्शन किंवा आदेश देण्यासाठी आज येथे आलेलो नाही, असे नमूद केले. त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांना उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर गुडघे टेकून व्यासपीठावरुन सर्वांना वाकून नमस्कार करुन अनोख्या पद्धतीने आभार मानले.

परीक्षा आणि रंगीत तालीमही
कार्यकर्त्यांचे सहकार्य आणि पाठिंब्यामुळेच मी निवडणुकीत विजयी होऊ शकले. कार्यकर्ते भिंगरी लावल्यासारखे माझ्या सोबत होते. जणु आपणच अश्विनी जगताप आहे, अशा प्रकारे प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्न करत होता, असे आमदार अश्विनी जगताप यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, या निवडणुकीला दुःखाची झालर होती. त्याचप्रमाणे, ही निवडणूक एक परीक्षाही होती. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने ही रंगीत तालीम ठरली. महापालिकेत आपले शंभर नगरसेवक निवडून येतील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news