पुणे : विमानतळावर राडा घालणारी तरुणी अटकेत; महिला अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा घेतला चावा | पुढारी

पुणे : विमानतळावर राडा घालणारी तरुणी अटकेत; महिला अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा घेतला चावा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोहगाव विमानतळावर गोंधळ घालून केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या प्रवासी तरुणीला अटक करण्यात आली. प्रवासी तरुणीने महिला अधिकाऱ्याच्या अंगठ्याचा चावा घेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. गुंजन राजेशकुमार अग्रवाल (वय २४, रा. हावडा, पश्चिम बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील निरीक्षक रुपाली ठोके (वय ३९) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी गुंजन प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारीतून लोहगाव विमानतळावर उतरली. त्या वेळी तिने भाड्यावरुन मोटारचालकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. मोटारचालकाने लोहगाव विमानतळ प्राधिकरणाकडे मदत मागितली. त्या वेळी विमानतळावरील व्यवस्थापक भक्ती लुल्ला या विमानतळावरील प्रवेशद्वार क्रमांक एक परिसरात गेल्या.

गुंजन विमानतळाच्या आवारात मोटारचालकाशी वाद घालून गोंधळ घालत होती. विमानतळावरील प्रवेशद्वारात रांगेत थांबलेल्या प्रवाशांना त्रास झाल्याने भक्ती लुल्ला यांनी तिला समजावून सांगितले. त्या वेळी केंद्रीय ओैद्योगिक सुरक्षा दलातील निरीक्षक ठोके आणि विमानतळ व्यवस्थापक लुल्ला यांच्याशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा चावा घेतला. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुंजनला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करत आहेत.

Back to top button