पुणे : महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून ८० हजारांचे दागिने हिसकावले | पुढारी

पुणे : महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून ८० हजारांचे दागिने हिसकावले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकून गळ्यातील ८० हजारांचा सुवर्णहार दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना धनकवडी भागात घडली. याबाबत एका ७२ वर्षीय ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहे. ज्येष्ठ महिला धनकवडीतील चैतन्यनगर भागातील मैदानाजवळून निघाली होती.

त्या वेळी दुचाकीस्वार चोरटा महिलेजवळ थांबला आणि त्याने महिलेच्या चेहऱ्यावर रंग टाकला. काही कळायच्या आत चोरटा महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपयांचा सुवर्णहार हिसकावून पसार झाला. पसार झालेल्या चोरट्याने ओळख लपविण्यासाठी चेहऱ्याला रंग लावला होता. एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करत आहेत.

Back to top button