शिंगवे येथे विहीरीत पडला बिबट्या

पारगाव(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना शिंगवे (ता. आंबेगाव) येथील गाढवे मळ्यात सोमवारी (दि. १३) पहाटेच्या वेळी घडली. शिंगवे गावाच्या उत्तरेला गाढवेवस्ती आहे. येथील भाऊसाहेब भिमाजी गाढवे यांच्या शेतात असलेल्या विहीरीतील वीजपंप सुरु करण्यासाठी सोमवारी (दि. १३ ) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रसाद शरद गाढवे व भरत भाऊसाहेब गाढवे हे गेले होते. यावेळी वीज पंप फुटल्यामुळे त्यांना पाणी उंच उडताना दिसले.
त्यांनी फुटलेला पाईप पाहण्यासाठी विहिरीत डोकावले असता त्यांना बिबट्या दिसला. बिबट्याने वीजपंपांचे दोन्ही पाईप दाताने चावले होते. दोन्ही पाईप चावल्यामुळे पाणी गळती झाली होती. त्यांनी पोलीस पाटील गणेश पंडित यांना घटनेची खबर दिली. गणेश पंडित यांनी वन विभागाला कळवले. वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक एस. एस. दहातोंडे, वनकर्मचारी संपत भोर, शरद जाधव व बिबट्या रेस्क्यू टिम घटनास्थळी तातडीने दाखल झाली आहे.