तांदूळवाडीच्या ऐतिहासिक वैभवाला झळाळी; दोन शिक्षकांमुळे मिळाली नवी ओळख | पुढारी

तांदूळवाडीच्या ऐतिहासिक वैभवाला झळाळी; दोन शिक्षकांमुळे मिळाली नवी ओळख

बारामती; पुढारी वृत्तसेवा : गेल्या नऊ- दहा वर्षांपूर्वी बारामती नगरपरिषदेत समाविष्ट झालेल्या परंतु तत्पूर्वी ग्रामीण बाज जपलेल्या तांदूळवाडीतील ऐतिहासिक वैभवाला नव्याने झळाळी मिळाली आहे. येथील दोन शिक्षकांचे योगदान त्यात महत्त्वपूर्ण ठरले आहे.
गावातील मंदिर परिसराचे सुशोभीकरण सुरू होते.

या वेळी भग्नावस्थेत अनेक मूर्ती, पुरातत्त्वीय अवशेष सर्वानुमते पाण्यात विसर्जित करण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला होता. यासाठीची तयारीही झाली होती. याबाबत विद्या प्रतिष्ठानच्या मनोज कुंभार व विनोद खटके या बारामतीच्या इतिहासावर काम करणार्‍या शिक्षकांना माहिती मिळाली. त्यांनी त्वरित स्थानिक रहिवासी तसेच माजी नगरसेवक समीर चव्हाण यांच्याशी संपर्क साधला व हा ऐतिहासिक ठेवा विसर्जित करू नये, अशी विनंती केली.

या शिक्षकांनी इतिहासाचे अभ्यासक डॉ. राहुल देशपांडे, आशुतोष अभ्यंकर यांना गावकर्‍यांसोबत चर्चेसाठी बोलावले. देशपांडे व अभ्यंकर यांनी या मूर्ती, बारव, मंदिर तसेच पुरातत्त्वीय अवशेषांचे महत्त्व पटवून दिले. यामुळे गावकर्‍यांनी निर्णय बदलून सर्व अवशेष एका कट्ट्यावर व्यवस्थित बसवून गावचा इतिहास जपला.

शिलालेखाचा उलगडा
तांदूळवाडी गावाच्या शेजारील एका शेतात सतीआईचे (सतीशिळा) छोटे मंदिर आहे. या मंदिराच्या पायरीवर एक शिलालेख आहे. सदर शिलालेखाची माहिती कुंभार व खटके यांनी अनिल दुधाने यांना दिली. त्यांनी शिलालेखाचे वाचन केले. त्यासाठी त्यांना विक्रांत मंडपे यांचे सहकार्य मिळाले. त्यावरील भाषा बाळबोध मराठी देवनागरी मिश्रस्वरूपाची आहे. मातेच्या स्मरणार्थ समाधी बांधणे / त्याची स्मृती जपणे हा त्याचा उद्देश असून, 15 व्या किंवा 16 व्या शतकातील ती आहे. शिलालेखावरील मजकुरानुसार सती गेलेल्या मातेच्या स्मरणार्थ ती बांधली गेली आहे. या वास्तूचे नुकसान करणार्‍याच्या घरावर गाढवाचा नांगर फिरेल, असे शाप वचन दिले आहे.

महादेव मंदिरातील ते शिल्प शिकारीचे
येथील गावात एका मंदिरात एक शिल्प असून, त्या मंदिरास गावकरी महादेव मंदिर म्हणतात. याच मंदिरात अनेक वर्षांपासून असणार्‍या शिल्पाबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती वीरगळ अभ्यासक दुधाने यांनी सदर शिल्पाचा अभ्यास करून हे शिल्प शिकार निदर्शक वीरगळ असल्याचे सांगितले.

आमच्या विनंतीला मान देऊन गावकर्‍यांनी पुरातत्त्वीय अवशेषांची जपणूक करण्याचे ठरवले. या कामासाठी राजाश्रय व लोकाश्रय मिळणे आवश्यक असते व तो बारामतीत मिळत असल्याचे समाधान वाटते. आपला वारसा पुढील पिढ्यांना कळावा यासाठी तांदूळवाडीप्रमाणे इतर गावांतील ग्रामस्थही काळजी घेतील अशी खात्री वाटते.

                                            – डॉ.राहुल देशपांडे, भारतीय विद्या अभ्यासक.

 

Back to top button