शेवाळेवाडीकरांनी वाचला समस्यांचा पाढा; सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी | पुढारी

शेवाळेवाडीकरांनी वाचला समस्यांचा पाढा; सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी

मांजरी; पुढारी वृत्तसेवा : नागरिकांना महापालिकेकडून पुरेशा मूलभूत नागरी सुविधा पुरविल्या जात नाहीत. परंतु, गावांमधून अवाजवी कर गोळा केला आहे. ‘केवळ भरमसाठ कर गोळा करण्यासाठी आमचे गाव महापालिकेत घेतले आहे का?’ असा सवाल शेवाळेवाडी येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. पुरेशा मूलभूत सुविधा दिल्या जाव्यात; अन्यथा महापालिकेला कोणत्याही प्रकारचा कर भरणार नाही. तसेच या विरोधात तीव्र जनआंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

शेवाळेवाडी येथे शंभू महादेव उत्सवानिमित्त बैठक आयोजित केली होती. या वेळी नागरिकांनी हा इशारा दिला. युवराज शेवाळे, अशोक शेवाळे, विक्रम शेवाळे, सचिन शेवाळे, गणपत शेवाळे, मोहन शेवाळे, नंदकुमार जगताप, अण्णासाहेब जाधव, बाळू भंडारी, अलंकार खेडेकर, बाबूराव शेवाळे, अमित शेवाळे, निखिल शेवाळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नागरिकंनी विविध समस्यांचा पाढा वाचला.

गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. ओढ्याला घाण पाणी येत असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. घाण पाण्यामुळे पाण्याचे जलस्रोत दूषित झाले आहेत. याबाबत हडपसर क्षेत्रीय कार्यालयास वारंवार कळविले. मात्र, अद्यापही कार्यवाही झाली नाही.

मुख्य रस्त्यावर हातगाडीवाले, फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे गावात वाहतूक कोंडी होत आहे. ग्रामपंचायतीने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त झाले असून, अनेक पथदिवेही बंद आहेत. ही सर्व कामे महापालिकेने आठवड्यात मार्गी लावावीत अन्यथा गावातून कोणताही कर महापालिकेकडे जमा केला जाणार नाही. तसेच महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही या वेळी नागरिकांनी दिला.

शेवाळेवाडी गावातील नागरी सुविधा सोडविण्याला प्राधान्य दिले जाईल. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर केली जाईल.

                              – प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर क्षेत्रीय कार्यालय.

 

 

Back to top button