पुणे : अवघा रंग एक झाला…तरुणाईचा आनंद द्विगुणित | पुढारी

पुणे : अवघा रंग एक झाला...तरुणाईचा आनंद द्विगुणित

पुणे : उन्हामुळे अंगाची काहिली होत असूनही रंगांची उधळण करत आणि पाणी उडवत तरुणाईने रंगपंचमीचा आनंद द्विगुणित केला. धूलिवंदनानंतर सुरू होणा-या वसंतोत्सवाच्या पाचव्या दिवशी, रविवारी शहरात रंगपंचमी उत्साहात साजरी झाली. रविवारची सुटी असल्याने नानाविध रंगांमध्ये तरुणाई अक्षरश: न्हाऊन निघाली. होळीनंतर दुस-या दिवशी राख, चिखल एकमेकांना लावत धूलिवंदनाचा सण साजरा केला जातो. त्यानंतर, पाच दिवसांनी येणा-या रंगपंचमीच्या दिवशी कोरड्या रंगांंची उधळण करत एकमेकांना पाण्याने चिंब भिजवले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये उत्तरेकडील प्रथेनुसार धूलिवंदनादिवशीच रंगांची उधळण केली जाते. रंगपंचमीच्या दिवशी तुलनेने रंग खेळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले आहे.

शहरात सकाळपासूनच लहान मुलांचे, तरुणांचे, महिलांचे ग्रूप रंगपंचमी खेळण्यासाठी घराबाहेर पडले होते. काही ठिकाणी मोठ्या मैदानांवर मोठ्या स्वरूपात रंगपंचमी खेळण्यात आली. विशेषत: पांढ-या रंगाचे कपडे घालून रंगपंचमी खेळली गेली. मित्र-मैत्रिणींबरोबर सेल्फी काढणे, विविध कट्ट्यांवर चहा-पानाचा आनंद घेणे असे बेत आखण्यात आले होते.

रंगपंचमीचा सण फाल्गुन कृष्णपक्ष पंचमीला साजरा केला जातो. देशाच्या विविध भागांमध्ये विशेषत: महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. धार्मिक आख्यायिकेनुसार, श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसह यादिवशी विविध रंगांची उधळण करत आनंद साजरा करत. तेव्हापासून रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. रंगपंचमीच्या दिवशी ब-याच घरांमध्ये पुरणपोळीचा बेत आखला जातो.

Back to top button