पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे शिष्यवृत्ती | पुढारी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे शिष्यवृत्ती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : ज्या विद्यार्थ्यांना अचानक आलेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो, तसेच ज्यांच्या पालकांना दुर्धर आजाराने ग्रासले आहे, अशा विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या अधिसभेत डॉ. अपूर्व हिरे आणि अशोक सावंत यांनी मांडला. त्याला प्रसेनजीत फडणवीस यांनी अनुमोदन दिले. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्याचे अधिसभा अध्यक्ष कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी जाहीर केले आहे.

विद्यापीठात 11 आणि 12 मार्चला अधिसभा पार पडली. या वेळी अधिसभा सदस्यांनी अनेक प्रस्ताव मांडले, तसेच प्रश्नोत्तराच्या तासात विविध विषयांवर घमासान चर्चा झाली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक निर्णय घेण्यात आले. दरम्यान या अधिसभेत अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. काळे यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक तसेच प्रशासकीय कामगिरीचा अहवाल सादर केला.

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अमृत सरोवर तयार करण्यात येणार असल्याचे डॉ. सोनवणे यांनी सांगितले. त्यासाठी पन्नास लाखांची तरतूद केली असल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच भारतीय विज्ञान परिषदेत विद्यार्थी सहभाग, भाषाशास्त्र आदींसाठी आर्थिक तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे डॉ. सोनवणे यांनी या वेळी सांगितले. अधिसभा सदस्यांचे आभार डॉ. प्रफुल्ल पवार यांनी मानले.

Back to top button