

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आत्ताच्या काळात गांधींजींच्या अहिंसा मार्गावर चालायाला हवे, मात्र, तसे कुठेही पहायला मिळत नाही. मागे मी ऐकले, पुण्यात कोयता गॅंगची मोठी दहशत आहे. कोयता गॅंगला ठोकून काढा, असे मी पोलिसांना जाता-जाता सांगणार आहे. अशा प्रकारे दहशत करणे, लोकशाहीला घातक आहे. असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बोलताना सांगितले. जितो पुणे (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन) च्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मंत्री सामंत बोलत होते. मिलिंद फडे यांना लाईफ टाईम आचिव्हमेंट अवार्ड देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ एस.के. जैन, जितोचे चेअरमन राजेशकुमार सांकला, व्हाईस चेअरमन विजय भंडारी व अन्य उपस्थित होते. यावेळी एस. के. जैन म्हणाले, नोकरी मिळविणारे विद्यार्थी देण्यापेक्षा, नोकरी देणारे विद्यार्थी घडवणारी संस्था महत्वाची आहे. अशा संस्थांना प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. काम करताना समाज भावना, राष्ट्र भावना असणे आवश्यक आहे.
सकाळी लागतो शिवीगाळ कारायचा 'शो'
जैन समाजाच्या चार संघटना एकत्र येऊन चांगले काम करत आहेत. राजकारणात असे घडणार नाही, त्याचे परिणाम आपण पहाताच आहोत. सकाळी उठून टिव्ही लावला की, लागतोच शो शिविगाळ करायचा. असे म्हणत सामंत यांनी संजय राऊतांवर टीका केली.
मान न दिल्याचे पडसाद राजकारणात आपण पाहिले
एकत्र येऊन निर्णय घेणे, साध्याच्या काळात खूपच आवश्यक आहे. राजकारणात हुकूमशाही वाढत आहे. लोकशाही राजकीय पक्षात असती, तर आम्हाला गुवाहाटीला जावे लागले नसते. जेव्हा तुम्ही एखाद्याला मान देता, तेव्हा तो तुम्हाला त्याची मान देतो, मात्र, तुम्ही त्याला मान देत नाही, तेव्हा तो माणूसही कधीतरी मोठा होत असतो. तेव्हाची स्थिती खूप वेगळी असते. त्याचे पडसादही खूप वेगळे असतात. ते प्रत्येकाने राज्याच्या राजकारणात पाहिले. असे यावेळी सामंत म्हणाले.
परदेशी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी दुबईला कॉन्फरन्स…
उद्योग आता नाही, मागेच गेले. उद्योजकाला जागा देण्याआधीच सीएसआर मागितला जाई. 2 टक्के सीएसआर देणे, उद्योजकाचे कर्तव्य आहे. मात्र, उद्योग उभा राहायच्या आधीच सीएसआर मागणे, चुकीचे आहे. माझे म्हणणे आहे की उद्योजकाने सीएसआर देताना सरकारला विचारू नका, मात्र, समाजाचे चांगले काम होईल, तेथे सीएसआर द्या. तसेच, परदेशी उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी आम्ही दुबईला कॉन्फरन्स घेणार आहे. असे सामंत यांनी सांगितले.