

ओतूर(ता. जुन्नर); पुढारी वृत्तसेवा : धोलवड येथील संत तुकारामनगर येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या प्रांगणात शिवनेरभूषण भागवताचार्य, गुरुवर्य वै. ह. भ. प. सुमंत महाराज नलावडे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि. 8 ते 11 मार्च या कालावधीत संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन बीज सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ही माहिती भागवताचार्य महेंद्र महाराज नलावडे यांनी दिली.
त्यानिमित्त आयोजित संकीर्तन महोत्सवात चिंतन केसरी ह.भ.प. भरत महाराज थोरात (वडगाव पाटोळे), नामदेव महाराज वाळके (वेळेश्वर संस्थान), आदिनाथ महाराज फपाळ (माजलगाव), शालीकराम महाराज खंदारे (वाशीम) यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घेतला. भागवताचार्य महेंद्र महाराज नलावडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता करण्यात आली.
सप्ताह काळात दैनंदिन काकडा भजन, गाथा भजन, हरिपाठ व हरिकीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवानिमित्त मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई व प्रांगणात उभारलेला भव्य शामियाना आणि हरिनामाचा गजर यामुळे अवघे वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
या काळात मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता. ओतूर व धोलवड पंचक्रोशी, पुणे, आगरवाडी, पालघर, रहाता- पिंपळस, साकुरी, शिर्डी, दहेगाव, सोनई, झापवाडी, शनी शिंगणापूर, संगमनेर, देऊळगाव राजे, मलठण आदी परिसरातील मान्यवर भाविकांनी कार्यक्रमास भेट दिली. सोहळा यशस्वीतेसाठी महेश महाराज नलावडे, प्रल्हाद महाराज नलावडे, चंद्रशेखर महाराज नलावडे, दयानंद महाराज नलावडे यांनी सहकार्य केले.