जेजुरी : ऐतिहासिक बंगाळी बारवची स्वच्छता सुरू

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीनगरीत ऐतिहासिक काळात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भाविकांसाठी निर्माण केलेली ऐतिहासिक बंगाळी बारव सध्या दुर्लक्षित झाली आहे. पुणे येथील सेवावार्धिनी संस्था, माय इंटिकल कंपनी, पवार महाविद्यालय आणि जेजुरी नगरपालिकेच्या वतीने या ऐतिहासिक बारवची स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. या तलावातील पाणी सायफन पद्धतीने शहरातील विविध 12 जलतीर्थ व हौदात सोडण्याची योजना ऐतिहासिक काळात केली होती. काळाच्या ओघात यातील अनेक तीर्थ व विहिरीचे अस्तित्व नष्ट होत चालले आहे.
जेजुरी येथील बंगाळी पटांगणात असणारी बारव दुर्लक्षित झाली आहे. या बारवमध्ये दगडगोटे, गाळ, घाण साचली असून, मोठ्या प्रमाणात झाडी उगवली आहेत. अशा दुर्लक्षित बारवचे पुनर्जीवन करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सेवावार्धिनी संस्था, माय इंटिकल कंपनी, जेजुरी नगरपालिका आणि पवार महाविद्यालय जेजुरी यांच्या वतीने शनिवारी (दि. 11) या बारवेत स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली.
सेवावार्धिनी संस्थेचे प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू करण्यात आली असून, कंपनीच्या रैना दुबे, पवार महाविद्यालयाचे डॉ. अरुण कोळेकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किरण बारभाई, सागर गोडसे, नगरपालिकेचे बाळासाहेब बगाडे, स्वामी समर्थ सेवा सर्व्हिसचे गोपाळ मोहरकर, भानुदास दावलकर, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याकडून निर्मिती
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी खंडोबाभक्तांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जेजुरी शहराच्या पश्चिमेला सुमारे 18 एकर परिसरात भव्य होळकर तलावाची निर्मिती अठराव्या शतकात केली.