निमोणे : साहेब तुम्हीच आमची कदर केली : दौलत शितोळे | पुढारी

निमोणे : साहेब तुम्हीच आमची कदर केली : दौलत शितोळे

निमोणे; पुढारी वृत्तसेवा :  साहेब, इतिहास साक्षीला आहे शेकडो पिढ्या बेरड, बेडर, रामोशी समाजाने इमानदारीने गावगाड्याची सेवा केली, मात्र आमच्या बरोबर कधीच माणूस म्हणून न्याय झाला नाही. मागील 70 वर्षांत आमच्या समाजासाठी महाराष्ट्राच्या कायदेमंडळात साधी चर्चासुध्दा कुणी घडवून आणली नाही. साहेब, तुम्ही खरे पुरोगामी आहात. आमच्यासारख्या उपेक्षित समाजाच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक महामंडळाची घोषणा करून हजारो वर्षांपासूनचा आमच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा दुरगामी निर्णय घेतला. बेडर, बेरड, रामोशी समाज यांची सदैव जाणीव ठेवेल असा शब्द जयमल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला

फडणवीस यांच्याशी थेट सलगी असलेले बहुजन नेते दौलत शितोळे मागील आठ वर्षांपासून बेरड, बेडर, रामोशी समाजाचे संघटन करून जयमल्हार क्रांती संघटनेच्या माध्यमातून काम करत आहेत. या समाजाचे असंख्य प्रश्न सरकार दरबारी मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन अनेक प्रश्न ऐरणीवर आणले.

फडणवीस यांनी उमाजी नाईक यांच्या जन्मस्थळावर येऊन महामंडळाचा शब्द दिला होता, अर्थसंकल्पात त्याची घोषणा झाल्यामुळे संपूर्ण रामोशी, बेरड, बेडर समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे. समाजाचे शिष्टमंडळ घेऊन दौलत शितोळे हे फडणवीस यांच्या भेटीला गेले, त्या वेळी भावनिक होऊन शितोळे यांनी …साहेब तुम्हीच आमचे कैवारी आहात … आम्हाला न्याय दिला, असे उद्गार काढले.

Back to top button