कुरकुंभ : युवकाच्या मृत्यूप्रकरणी अखेर चौकशी सुरू

कुरकुंभ : युवकाच्या मृत्यूप्रकरणी अखेर चौकशी सुरू

कुरकुंभ; पुढारी वृत्तसेवा : दौंड येथील दीपक ऊर्फ नाना मोहन खंडाळे यांच्या मृत्यू प्रकरणाची कुरकुंभ व दौंड पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. सध्या याबाबत अकस्मात मृत्यू म्हणून दौंड पोलिस ठाण्यात नोंद केली आहे. महत्त्वाचे म्हणजे अपघाताच्या तब्बल 15 दिवसांनंतर पोलिसांनी ही चौकशी सुरू केली आहे. याबाबत अधिक माहितीनुसार, दीपक खंडाळे (रा. लालुशेठ चाळ, हुतात्मा चौक, दौंड) हा कुरकुंभ एमआयडीसीतील रिलायन्स कंपनीत कामाला होता. 'दीपकचा अपघात झाला. तू उपजिल्हा रुग्णालय दौंड येथे ये' असे म्हणून दीपकचा भाऊ नीलेश दत्तात्रय खंडाळे याला बुधवारी (दि. 8) सायंकाळी फोन आला होता. दीपकचा मित्र मयूर तुपसौदर्य (रा. साठेनगर, दौंड) यालादेखील मार लागलेला आहे.

मालवाहतूक करणाऱ्या एका वाहनातून सोबत असलेल्या मित्रांनी दीपकला कुरकुंभमधील खासगी रुग्णालयात नेले. मात्र, त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तेथून दौंडला पाठविण्यात आले. परंतु उपचारापूर्वी दीपक खंडाळेचा मृत्यू झाला. ही घटना घडून 15 तास उलटून गेले, तरी हा प्रकार नेमका कसा व कुठे घडला, याचा पोलिसांसह कोणालाच ठावठिकाणा नव्हता. दीपक सोबत असणारे मित्र बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

दरम्यान, दीपकची पत्नी व नातेवाइकांनी पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्याशी चर्चा केली. पोलिसांनी दीपक खंडाळे याच्यासोबत असलेल्या मित्रांची चौकशी केली. त्यामुळे ही घटना कशी घडली कशी हे समोर येण्यास सुरुवात झाली. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, सहायक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस हवालदार महेंद्र गायकवाड, सहायक फौजदार अनिल कोळेकर, शंकर वाघमारे यांनी घटनास्थळी भेट दिली. चौकशीतून पांढरेवाडी (ता. दौंड) हद्दीतील अपघाताचे घटनास्थळ व इतर माहिती पोलिसांना मिळाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news