बारामती : यंत्रणांचा गैरवापर हे दुर्दैव : आमदार रोहित पवार
बारामती; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या पत्नी 'आम्हाला गोळ्या घाला,' असे म्हणत असतील; तर देशात यंत्रणांचा गैरवापर किती भयानक पद्धतीने सुरू आहे, हे दिसून येईल. अशा पद्धतीचा गैरवापर अत्यंत दुर्दैवी असल्याचे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते
. पवार म्हणाले की, मुश्रीम यांच्या घरी अनेकदा छापे मारल्यावर पुन्हा छापे टाकले जात आहेत. यात कदाचित अधिकार्यांची चूक नसावी. राज्य सरकारमधील काही लोक केंद्राला सांगून या यंत्रणेचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुम्ही जर चूक केली नसताना तुमच्या घरी वारंवार छापे टाकून कुटुंबाला त्रास दिला जात असेल, तर कुटुंबाची मानसिकता काय होत असेल? असा सवाल पवार यांनी केला.
इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. त्यामुळे अनेक योजना अडकून पडल्या आहेत. राज्यातील पोटनिवडणुकींचा लागलेला निकाल हा शिंदे-फडणवीस यांच्या बाजूने लागलेला नाही. जे सर्व्हे येत आहेत, त्यावरून त्यांच्याविरोधात कौल जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी बघता हे सरकार किती दिवस टिकेल, हे सांगता येत नाही, असेही पवार यांनी सांगितले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवा, अशी टीका केली असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, विखे-पवार हे नाते फार जुने आहे. माझे व त्यांचे आजोबा फार जवळ असायचे. त्या कुटुंबाला आम्ही खूप जवळून ओळखतो. ते जे बोलले, त्यात त्यांच्या मनात काय व ओठांवर काय आहे? याचा अंदाज मी घेऊ शकतो. यातून जो काय संदेश मिळायचा तो दोघांना मिळाला आहे. पण, मी ते वक्तव्य गांभीर्याने घेतले नाही.

