पिंपरी : …अरे हा तर हुबेहूब आमीर खानच ! | पुढारी

पिंपरी : ...अरे हा तर हुबेहूब आमीर खानच !

पिंपरी : अतिशय साध्या पेहरावात एकजण पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीत घुसतो. त्याला पाहून…अरे हा तर हुबेहूब आमीर खानच दिसतोय, अशी कुजबूज पोलिसांत सुरू होते. त्यावर आपण खरेखुरे अमीर खान असून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांना भेटण्यासाठी आल्याचे तो सांगतो. त्यानंतर मात्र, पोलिसांना ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला शुक्रवारी (दि. 10) रात्री आठच्या सुमारास अमीर खान याने अचानक भेट दिली. बॉलिवुडचा किंग अमीर खान याने अनेक चित्रपटांमधून पोलिस अधिकार्‍याची भूमिका साकारली आहे. अभिनयातून पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्यामुळे पोलिसही त्याचे चाहते आहेत.

अचानक अमीर खान आपल्यासमोर आल्याचे पाहून सुरुवातीला पोलिसांनी त्यांना ओळखलेच नाही. मात्र, खराखुरा अमीर खान आपल्यासमोर असल्याचे समजताच फोटो काढण्यासाठी पोलिसांनी गर्दी केली. अमीर खान यांनीही आढेवेढे न घेता पोलिसांना मनसोक्त फोटो काढू दिले.

सदिच्छा भेट की बंदोबस्तासाठी चर्चा ?
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे हे मुंबई येथे होते. त्या वेळी अमीर खान आणि आयुक्त यांची ओळख झाली. त्या ओळखीतून अमीर याने मित्र म्हणून पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांची भेट घेत चर्चा केली, असे सांगण्यात आले. मात्र, अमीर खान याच्या बालेवाडी येथे होणार्‍या पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमासाठी बंदोबस्त व इतर चर्चा करण्यासाठी अमीर खानने पोलिस आयुक्तांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

Back to top button