तळेगाव ढमढेरे : व्यक्तिचित्र रेखाटण्याचा विद्यार्थ्याचा अनोखा छंद!

तळेगाव ढमढेरे; पुढारी वृत्तसेवा : ओम कोकरे हा चित्रकलेची आवड असलेला शालेय विद्यार्थी. त्याने रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांमुळे तो तालुक्यात नवोदित चित्रकार म्हणून नावारूपास आला आहे. दहिवडी (ता. शिरूर) येथील ओम संदीप कोकरे हा बारावीत शिकणारा विद्यार्थी आईच्या मार्गदर्शनाखाली व वडिलांकडून प्रेरणा घेत चित्रकलेचा छंद जोपासत आहे. सुरुवातीला निसर्गचित्र, प्राणी व पक्षी यांची चित्रे काढून आकर्षक पद्धतीने तो रंगभरण करीत असे. त्यानंतर त्याने त्याची कला विकसित करीत तो व्यक्तिचित्र रेखाटू लागला. सुरुवातीला देवतांची, कलाकारांची, खेळाडूंची व मित्रांची चित्रे त्याने रेखाटली. अल्पावधीतच तो प्रसिद्ध चित्रकार म्हणून ओळखला जात आहे.
ओम कोकरे याने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, रजनीकांत, सलमान खान, अक्षयकुमार, माधुरी दीक्षित, विराट कोहली आदींची चित्रे रेखाटली आहेत. राजकीय व्यक्तिमत्त्वांमध्ये खा. शरद पवार, आमदार अशोक पवार, मानसिंग पाचुंदकर, आबाराजे मांढरे, पंडित दरेकर आदींची व्यक्तिचित्रे हुबेहूब रेखाटून त्यांना भेट दिली आहेत.
त्याचबरोबर त्याने आपल्या आई-वडिलांचे व्यक्तिचित्र देखील रेखाटले आहे. ते त्याला सर्वाधिक आवडत असून, त्यामधून प्रेरणा मिळत असल्याचेही त्याने सांगितले. ओमला त्याचा छंद जोपासण्यासाठी स्वतंत्र खोली असून, आई-वडिलांनी त्याला चित्र रेखाटण्यासाठी आवश्यक ती सर्व साधनसामग्री पुरवली आहे. सामाजिक हित जोपासत भविष्यात उत्तम चित्रकार होण्याचे स्वप्न उराशी बाळगल्याचे या प्रसंगी ओम कोकरे याने सांगितले.