पिंपरी : श्रेय घेण्याची हौस आम्हाला नाही; नारळ त्यांनीच फोडावे : माजी मंत्री बाळा भेगडे | पुढारी

पिंपरी : श्रेय घेण्याची हौस आम्हाला नाही; नारळ त्यांनीच फोडावे : माजी मंत्री बाळा भेगडे

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी शिंदे -फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात सुमारे 350 कोटी व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सुमारे 51 कोटी असा सुमारे 400 कोटींचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या माध्यमातून विकासाला गती देऊन पुन्हा उज्वल मावळ उभारू, मात्र विकासाचे श्रेय घेण्याची आम्हाला हौस नाही. त्यामुळे त्यांनीच नारळ फोडावे, असे स्पष्टीकरण माजी मंत्री संजय भेगडे यांनी पत्रकार परिषदेत केले.

वडगाव मावळ येथील भाजपच्या मुख्य कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, बाळासाहेब घोटकुले, संदीप काकडे, भाऊसाहेब गुंड, गणेश ठाकर, अनंता कुडे, किरण म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, दीपाली मोरे आदी उपस्थित होते.

माजी मंत्री भेगडे यांनी या वेळी बोलताना राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या मावळ तालुक्यातील विविध विकासकामांची व निधीची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने महायुती सरकारने निर्णय घेतलेल्या हायब—ीड ऍन्यूटीअंतर्गत कामांना महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. आता या सरकारने या योजनेला सुमारे 350 कोटींची तरतूद करून पुन्हा गती देण्याचे काम केले आहे.

आघाडी सरकारच्या काळात स्थगिती दिलेल्या कामांना मोठा निधी 

याशिवाय माजी मंत्री भेगडे यांच्या शिफारशी वरूनच सोमाटणे ते शिवणे, वडगाव-कातवी-वराळे-इंदोरी व काले कॉलनी ते कोथुर्णे या रस्त्यांसाठी 7 कोटी 47 लाख 50 हजार रुपये निधी सरकारने मंजूर केला आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थगित झालेल्या तलाठी कार्यालय, प्रशासकीय इमारत, उपजिल्हा रुग्णालय, पूल, रस्ते या कामांनाही मोठा निधी दिला असल्याचे सांगितले.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तळेगाव, लोणावळा नगर परिषद व वडगाव नगरपंचायतसाठी एकूण 31 कोटी, क्रीडा विभागाच्या माध्यमातून 40 कोटी, डिजिटल शाळा व डिजिटल क्लासरूम, अंगणवाडी बेंच, रस्ते, पूल, साकव आदी कामांसाठी सुमारे 51 कोटी 63 लाख 14 हजार रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. सरकारने शेतकरी, महिला, कामगार, विद्यार्थी, बेरोजगार असा सर्वांगीण दृष्टिकोन ठेवून हा अर्थसंकल्प केला असल्याचे सांगितले.

लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी करू 

गहुंजे येथील योजनेवरून मावळ तालुक्यात राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनांमध्ये मोठा भ—ष्टाचार झाला असल्याचा आरोप भेगडे यांनी केला आहे. तसेच, एमआयडीसी टप्पा 4 मधील शेतकर्‍यांना अडीच वर्षे मोबदला मिळाला नाही. आमचे सरकार सत्तेवर आले आणि सातव्या दिवशी 150 कोटी रुपये जमा झाले असल्याचे सांगून केवळ कमिशनसाठी पेमेंट वाटप होत नव्हते, असाही आरोप करून लवकरच दूध का दूध पाणी का पाणी करणार असल्याचेही माजी मंत्री भेगडे यांनी स्पष्ट केले.

बंदिस्त जलवाहिनीबाबत अजूनही आम्ही ठाम 

आघाडी सरकार गेले, महायुती सरकार गेले, महाविकास आघाडी सरकार गेले आता शिंदे – फडणवीस सरकार आले तरी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प निर्णयाच्या उंबरठ्यावर असल्याबाबत निदर्शनास आणून दिले असता भेगडे यांनी आम्ही या प्रकल्पाबाबत पहिल्या दिवशी ज्या भूमिकेत होतो, त्याच भूमिकेवर आजही ठाम असल्याचे सांगितले. हा प्रकल्प रद्दच व्हावा, यासाठी आग्रही राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा की विधानसभा? पक्ष सांगेल ते 

आगामी लोकसभा की विधानसभा निवडणूक लढवणार, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना भेगडे यांनी पक्ष सांगेल ते अशा तीन शब्दांत उत्तर दिले. पक्षाने सांगितले तर निवडणूक लढेन किंवा पक्ष सांगेल त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी जीवाचे रान करीन, असे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button