पुणे : राहुल गांधींकडून सैनिकांचे खच्चीकरण; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची टीका | पुढारी

पुणे : राहुल गांधींकडून सैनिकांचे खच्चीकरण; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची टीका

पुणे; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ’भारत जोडो यात्रा’ नसून, ती ’भारत तोडो यात्रा’ ठरल्याचे त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येत आहे. परदेशी भूमीवरून ते करत असलेली देशविरोधी विधाने भारतीय सैनिकांचे मनोबल खच्ची करणारी आहेत, अशी टीका केंद्रीय क्रीडा व युवक कल्याणमंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. तसेच दिल्लीतील मद्य परवाना प्रकरणामध्ये ’आप’चे नेते मनीष सिसोदिया हे मुख्य आरोपी असले, तरी मुख्य सूत्रधार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच आहेत, असा आरोपही ठाकूर यांनी केला.

शहर भाजप कार्यालयात शनिवारी (दि.11)आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, धीरज घाटे, अर्चना पाटील आदी उपस्थित होते. ठाकूर म्हणाले, ’राहुल गांधी परदेशातून देश तोडणारी विधाने करत आहेत. तीन राज्यांतील पराभवाच्या निराशेतून ते विधाने करत आहेत. गांधी परिवार आणि काँग्रेसचे नेते सैनिकांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम करत असून, यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान खाली जात आहे.’

आसाम आणि अरुणाचल प्रदेशांत तैनात असलेल्या भारतीय जवानांना ते ’ऑक्यूपाइड आर्मी ’ असे संबोधत आहेत. असे असेल तर आसाम आणि अरुणाचल प्रदेशला हा भूभाग भारताचा नाही का, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली. तेलंगणातील सत्ताधारी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात पोस्टरबाजी केल्याबाबतच्या प्रश्नावर ते म्हणाले, ’तेलंगणा सरकारने मोठ्या प्रमाणावर भ—ष्टाचार करून सरकारी तिजोरी रिकामी केली आहे.

तेथील माजी खासदार के. कविता यांचा दिल्ली सरकारच्या मद्य परवाना घोटाळ्यात सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. भ्रष्टाचार केला नसेल, तर त्या चौकशीला का घाबरत आहेत?’ दिल्ली सरकार या प्रकरणाशी संबंधित ज्या ’व्ही’ इनिशिअल असलेल्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या व्यक्तीला केजरीवाल यांचाच पाठिंबा आहे, असाही आरोप ठाकूर यांनी केला.

Back to top button