पुणे : हैदराबादी लिंबाने वाढली सरबताची गोडी | पुढारी

पुणे : हैदराबादी लिंबाने वाढली सरबताची गोडी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाचा कडाका वाढल्याने गुलटेकडी मार्केट यार्डात पुणे विभागासह हैदराबाद येथूनही लिंबे बाजारात दाखल होऊ लागली आहेत. स्थानिक लिंबांच्या तुलनेत आकाराने मोठी व रसदार असल्याने गुर्‍हाळे, सरबत विक्रेते यांच्याकडून हैदराबादी लिंबांच्या मागणीत वाढ झाली आहे. सध्या बाजारात हैदराबाद येथून दररोज 23 ते 27 किलोंच्या 150 ते 200 गोण्यांची आवक होत असून, घाऊक बाजारात त्याला 1500 ते 200 रुपये दर मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात 20 रुपयांना चार ते पाच नगांची विक्री करण्यात येत आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत अहमदनगर जिल्ह्यातील राशीन, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी व पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून लिंबे दाखल होतात. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी मागील महिन्यात मार्केट यार्डात दररोज अडीच ते तीन हजार गोण्यांची आवक होत होती. या वेळी, लिंबाच्या 15 किलोच्या गोणीला 200 ते 300 रुपये भाव मिळत होता.

सध्या लिंबाची आवक एक ते दीड हजार गोण्यांवर आली आहे. तर हैदराबाद येथून 150 ते 200 गोणी बाजारात दाखल होत आहेत. घाऊक बाजारात स्थानिक भागातून दाखल होणार्‍या 15 ते 20 किलोंच्या गोणीला 300 ते 1 हजार 500 रुपये तर हैदराबाद येथून दाखल होणार्‍या 23 ते 27 किलोंच्या गोणीला 1 हजार 500 ते 2 हजार 200 रुपये भाव मिळत आहे. गुर्‍हाळचालक, सरबत विक्रेते यांसह घरगुती ग्राहकांकडूनही हैदराबादी लिंबांना मोठी मागणी आहे.

सध्या बाजारात लिंबाची आवक कमी असून, मागणी जास्त असल्याने दर चांगले आहेत. त्यामुळे, हैदराबाद येथील शेतकर्‍यांनी लिंबे बाजारात पाठविण्यास सुरुवात केली आहे.

                                                      – रोहन जाधव,
                                                 लिंबू व्यापारी, मार्केटयार्ड

Back to top button