पुणे : ‘डीएसके’ रस्त्याला खोदकामाचे ग्रहण! | पुढारी

पुणे : ‘डीएसके’ रस्त्याला खोदकामाचे ग्रहण!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : धायरी ते डीएसके विश्व या दीड किलोमीटर रस्त्यावर महिनाभरात दोनवेळा खोदकाम करण्यात येते. या खोदकामामुळे रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून, वाहनचालकांना मणक्याच्या व्याधी जडत आहेत. नेमके हे खोदकाम कशासाठी केले जाते हे न उलगडणारे कोडे आहे. हा रस्ता तातडीने दुरूस्त करण्याची मागणी वाहनचालकांनी केली आहे.

उपनगरातील धायरी भागातील अतिशय गजबजलेले असे डीएसके विश्व हे गृहसंकुल आहे. धायरी ते डीएसके विश्व हा मार्ग केवळ दीड किलोमीटर आहे. या रस्त्यावर डीएसके विश्वसह अनेक छोटी-मोठी 15 ते 20 गृहसंकुले आहेत. त्यामुळे या भागात मोठी लोकसंख्या आहे. येथील रस्त्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले. एका बाजूचा रस्ता मागील महिनाभरात दोनवेळा खोदण्यात आला. मात्र, त्याची डागडुजी न करता ता तसाच ओबडधोबड सोडून देण्यात आला.

परिणामी, या ठिकाणी दुचाकीच काय चारचाकी वाहन चालविणेदेखील कठीण झाले आहे. या खड्डेमय रस्त्याला लागूनच एक वॉशिंग सेंटर तसेच टँकर भरण्यासाठीची व्यवस्था आहे. त्यामुळे या वॉशिंग सेंटरवर आलेल्या गाड्या आणि पाणी भरण्यासाठी आलेले मोठे टँकर रस्त्यालगत उभे राहत असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीदेखील होते. परंतु याकडे संबंधित दुर्लक्ष करतात. परिणामी, येथे अपघाताची दाट शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आता जोर धरत आहे.

वर्षात दोनदा डांबरीकरण
धायरी फाटा ते धायरी गाव हा मुख्य रस्ता डांबरीकरणाचा आहे. मागील वर्षभरात या रस्त्याचे दोनवेळा डांबरीकरण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे या रस्त्याला काही झालेले नसताना या रस्त्यावर डांबराचे थर चढविणे सुरू आहे. तर दुसरीकडे धायरी-डीएसके विश्व रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Back to top button