हडपसर : मगरपट्टा रस्त्यावर चोवीस तास खोदाई! नागरिक त्रस्त | पुढारी

हडपसर : मगरपट्टा रस्त्यावर चोवीस तास खोदाई! नागरिक त्रस्त

प्रमोद गिरी

हडपसर : हडपसर-मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर गेली महिनाभरापासून पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी रात्रंदिवस खोदाई सुरू आहे. मात्र, महापालिका प्रशासन व ठेकेदारात ताळमेळ नसल्याने हे काम संथ गतीने सुरू आहे. या कामामुळे वीजवाहिन्या तुटत असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच, पाणीपुरवठा देखील अनियिमित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. हे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

मगरपट्टा, मुंढवा रोड, साउथ गेटपासून नोबल हॉस्पिटलपर्यंत भर दिवसा पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. मुख्य रस्त्याच्या कडेला रात्रीच खोदकाम करावे, असा महापालिकेचा नियम आहे. मात्र, हा नियम या ठिकाणी धाब्यावर बसवून दिवसा रस्त्याची खोदाई केली जात असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे वाहनचालक व नागरिक त्रस्त झाले आहेत. जवळच नोबेल हॉस्पिटल असल्यामुळे रुग्णांची देखील गैरसोय हात आहे. रुग्णवाहिकादेखील वाहतूक कोंडीत अडकून पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

हडपसर वाहतूक विभागाने खोदकाम करणार्‍या ठेकेदाराला हे काम रात्रीचे करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, वाहतूक पोलिसांच्या सूचनेकडे संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत असून, चोवीस तास रस्त्याची खोदाई सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी अरुंद रस्ता झाला आहे. केवळ एक वाहन जाईल एवढी जागा रस्त्यावर शिल्लक राहत आहे. यामुळे परिसरात वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहतूक पोलिसांची धावपळ होत आहे. या कामामुळे जनवाहिन्या तुटत असल्याने पाणीपुरवठा देखील खंडित होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच पावसाळी वाहिनी टाकण्यासाठी महापालिकेकडून खोदाई सुरू असल्याने कोंडीत आणखीन भर पडत आहे. चोवीस तास सुरू असलेल्या या कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने हे काम तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

                           -संदीप देसाई, नागरिक

या रस्त्यावर पावसाळी वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. हे काम करताना विद्युत केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. परंतु, हे काम होणे गरजेचे असून, ते लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल.

                     -शैलेश क्षीरसागर, कनिष्ठ अभियंता, महापालिका

Back to top button