कसब्यातील पराभवाचे ‘पोस्टमार्टेम’; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती | पुढारी

कसब्यातील पराभवाचे ‘पोस्टमार्टेम’; उपमुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : “एखादी निवडणूक जिंकतो किंवा हरतो, यामुळे फरक पडत नाही. निवडणुकीच्या विजयानंतर किंवा पराजयानंतर आम्ही मूल्यमापन करीत असतो. त्यामुळे कसबा पेठ पोटनिवडणुकीतील पराभवाचे पोस्टमार्टेम आम्ही केले आहे. त्यानुसार आम्ही योग्य ती काळजी घेऊ,” असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप व शिवसेनेने मोठी ताकद लावूनही महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या पराभवानंतर फडणवीस शनिवारी पहिल्यांदाच पुण्यात आले.

या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना कसब्यातील पराभवासंदर्भात प्रश्न विचारले. त्यावर ते म्हणाले की, कसबा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. पक्षाचे शीर्षस्थ नेते आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यात ठाण मांडून होते. शिंदेंनी तर रात्री-अपरात्री प्रचार केला. गल्लीबोळात रॅली निघाल्या. परंतु, तरीही भाजपला बालेकिल्ल्यात पराभवाचे तोंड बघावे लागले, त्यामुळे हा पराभव जिव्हारी लागणे स्वाभाविक आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सुरू असलेल्या कारवाईची माहिती नसल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले. अवकाळी पाऊस झाल्यानंतर तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. शेतकर्‍याने स्वतः फोटो काढला, तरी त्याला आम्ही पंचनामा मानतो.
आता विरोधक रात्री पाऊस पडला, तरी सकाळी पैसे मागतात. त्यांच्या काळात पंचनामे झाले, आम्ही अजूनही त्याचे पैसे देत आहोत, अशीही टीका फडणवीस यांनी या वेळी केली. अवकाळी पावसाच्या संकटावेळी विरोधकांनी गोंधळ न घालता संवेदनशीलपणे विचार करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button