पिंपरी : पोटनिवडणुकीचे कमी वेळेत उत्तम नियोजन : विरोधी पक्षनेते अजित पवार | पुढारी

पिंपरी : पोटनिवडणुकीचे कमी वेळेत उत्तम नियोजन : विरोधी पक्षनेते अजित पवार

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना नियोजनासाठी आणि प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. असे असतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अत्यंत उत्तम नियोजन केले. पुढील निवडणुकीमध्ये आपला विजय नक्की असून खचून न जाता नव्या जोमाने कामाला लागा, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसनचे सर्वेसर्वा तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार काटे यांना सुमारे 1 लाख मते मिळाली. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा तब्बल 60 हजार मते अधिकची खेचण्यात कार्यकर्त्यांना यश आले. अपक्ष उमेदवारामुळे महाविकास आघाडीतील मतांची फाटाफूट झाली. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.10) अजित पवार यांची पुण्यात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उमेदवार नाना काटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगसेवक संतोष कोकणे, विनोद नढे, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष अविनाश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांनी पोटनिवडणुकीत पडलेल्या मतांसह प्रभाग व बुथनिहाय मतांची माहिती घेतली.

ते म्हणाले की, निवडणुकीत कमी वेळेत अधिक मते मिळविण्यात सर्वांच्या कष्टामुळे यश मिळाले. विजय-पराजय हे निवडणुकीत होतच असतात. मात्र, आपलेल्या मिळालेली मते ही आपली विश्वास द्विगुणीत करणारी आहेत. त्यामुळे खचून न जाता येणार्‍या प्रत्येक निवडणुकीत यश मिळविण्याच्या दृष्टीने आतापासून तयारीला लागा.

अधिवेशन संपल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरात बैठक घेणार आहे. त्यावेळी पुढील निवडणुकांच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. आपण राज्य शासन, महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या कामाला आतापासूनच लागा. पुढील निवडणुकांमध्ये मतदार आपल्यालाच संधी देतील आणि आपला विजय होईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखविला.

Back to top button