पिंपरी : आधी पूर्ण रक्कम भरा ; मगच घराचा ताबा | पुढारी

पिंपरी : आधी पूर्ण रक्कम भरा ; मगच घराचा ताबा

दीपेश सुराणा : 

पिंपरी : पेठ क्रमांक 12 येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील घरांसाठी नागरिकांनी आधी पूर्ण रक्कम भरावी, त्यानंतरच त्यांना घराचा ताबा दिला जाईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्याचप्रमाणे, पीएआरडीएकडून नागरिकांना घरांचा ताबा देण्यासाठी ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. पीएमआरडीएने सध्या ई-नोंदणी प्रक्रिया सुरू केली असली तरी विविध अटी-शर्ती आणि किचकट प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच नागरिकांना घराचा ताबा मिळणार असल्याने नागरिक चिंतीत आहेत.

पीएमआरडीएने पेठ क्रमांक 12 येथे ईडब्ल्यूएस गटासाठी 3 हजार 317 सदनिका तर, एलआयजी गटासाठी 1 हजार 566 सदनिका अशा एकूण 4 हजार 883 सदनिकांचा गृहप्रकल्प साकारला आहे. या सदनिकांची सोडत पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे.
ज्या नागरिकांनी सदनिकेची पूर्ण रक्कम भरलेली आहे त्यांच्या समवेतच करारनामा करण्याची ई-नोंदणी पद्धतीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. सदनिकांच्या ई-नोंदणीसाठी 6 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 18 एप्रिलपर्यंतचे वेळापत्रक त्यासाठी निश्चित करण्यात आले आहे.

दंड रकमेचाही भुर्दंड
तात्पुरते वाटपपत्र व अंतिम वाटपपत्रात नमूद केलेल्या नमूद रकमांचे हप्ते भरण्यास झालेल्या विलंबाच्या कालावधीसाठी 5.48 टक्के (वार्षिक दराने) दंडनीय व्याजाची रक्कम भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. अशी रक्कम भरल्यानंतरच सदनिकांचे रजिस्ट्रेशन करण्यात येणार आहे, असे सहआयुक्त बन्सी गवळी यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button