महिला पदाधिकारी झाल्या म्हणजे भ्रष्टाचार करायचा का? शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षांची टीका | पुढारी

महिला पदाधिकारी झाल्या म्हणजे भ्रष्टाचार करायचा का? शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षांची टीका

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : महिला पदाधिकारी झाल्या म्हणजे भ्रष्टाचार खपवून घ्यायचा का ? टक्केवारी घेऊन कामे करणार्‍यांनी आमच्या नेतृत्वावर बोलणे म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा असल्याची टीका जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याविरोधात शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी राजगुरुनगर येथे शुक्रवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत केली.
महिला अध्यक्षा म्हणून आम्ही आदर करतो म्हणूनच गेल्या अडीच- तीन वर्षात कधी बोललो नाही.

पण, आता यांच्या सर्व कामांची खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी वरिष्ठ स्तरावर करणार आहोत, असे पोखरकर म्हणाले. जेवढी जास्त कामे तेवढा जास्त भ—ष्टाचार हे खेड राष्ट्रवादी काँग्रेसचे काम झाले आहे. जास्त कामे करून मोठी टक्केवारी लाटायची ही त्यांच्यात स्पर्धा सुरू आहे. स्वतःचे मोठे बंगले झाले म्हणजे जनतेचे हित साध्य झाले असा समज करून आणि आमदार मोहिते यांना खुश करण्यासाठी काही जण बरळत आहेत. नगरपरिषद निवडणुकीत एका साध्या कर्मचार्‍याने पराभूत केले, असा भ्रष्टाचारी व अशिक्षित व तालुकाध्यक्ष तालुक्यात येऊ देणार नाही असे म्हणतो. म्हणजेच खेड तालुका यांना बिहार वाटतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर यांच्यावर केली.

आढळराव पाटील हे जनतेच्या मनातले नेतृत्व आहेत. भ्रष्टाचार उघड झाला म्हणून त्यांना तालुक्यात येऊ- जाऊ देणार नाही असे म्हणणे हास्यास्पद वाटते. एवढीच खुमखुमी असेल तर तालुकाध्यक्षाच्या घरापुढे बँड लावून आढळराव यांची मिरवणूक काढू असे पोखरकर म्हणाले. याशिवाय कात्रज संघात दूध गढूळ करून मलई खाणार्‍या अरुण चांभारे यांनी आढळराव पाटील यांच्यावर नाहक टीका करणे म्हणजे एक आश्चर्य असल्याची खोचक टीका पोखरकर यांनी केली. माजी खासदार, शिंदे सेनेचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, महिला अध्यक्ष ज्योती आरगडे, केशव आरगडे, वैभव गावडे, संतोष गारडी आदी या वेळी उपस्थित होते.

बिनकामाचे कोण निवडून देते का : आढळराव
खेड तालुक्यातील विकासकामांना आढळराव नेहमी खो घालतात, असे आमदार दिलीप मोहिते पाटील नेहमी म्हणतात, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थिती केला. त्यावर हे केवळ मोहित्यांच्या स्वभावामुळे घडत आहे असे आढळराव पाटील यांनी सांगितले. 15 वर्षे खासदार व्हायला तीनदा निवडणुका लढवल्या. बिनकामाचे कोण निवडून देते का ? खेड तालुक्यात आदिवासी भागातील रस्त्यांचे जाळे उभे केले. राजगुरुनगर शहरात 13 कोटी रुपयांचा पूल बांधला. हुतात्मा शिल्प उभारणी केली.

जुन्नर, आंबेगाव व शिरूर तालुक्यातील आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, ते असे बोलत नाहीत. मोहिते सतत ढवळत असतात, विमानतळ माझ्यामुळे गेले म्हणतात. मग, आता अडीच वर्षे तुमचे सरकार होते. गेल्या चार वर्षात राष्ट्रवादीचा खासदार आहे. त्यांची कामे मोजा. खेडची प्रशासकीय इमारत आम्हीच करणार, त्यासाठी 25 कोटी रुपये मिळाले आहेत. माजी आमदार सुरेश गोरे यांनी केलेल्या कामाला खोडा घालून त्याच जागी प्रशासकीय इमारतीचा आग्रह का ? एवढेच होते तर त्याआधी प्रशासकीय इमारत का सुचली नाही ? असे आढळराव पाटील म्हणाले.

भ्रष्टाचार उघड करणे अनादर नव्हे
वाकळवाडीत काम न करता ठेकेदाराने दीड वर्षांपूर्वी पैसे काढून घेतले. यावर भ—ष्टाचार उघड झाला आणि तो जनतेसमोर आणला की, महिलेचा अनादर केला असे होत नाही. वाकळवाडीत काम न करता पैसे काढून घेणे ही चूक आहे. त्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, तेवढीच पदाधिकारी यांचीसुद्धा आहे. अधिकारी कुणाचा तरी आधार असल्याशिवाय अशी मनमानी करणार नाहीत, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

Back to top button