बेल्हे : रानमळा परिसराचा पाणीप्रश्न मार्गी

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पिंपळगाव जोगे डाव्या कालव्यावर सा. क्र. 47/250 येथे थेट विमोचक मंजुरी मिळाल्याने रानमळा परिसरातील शेती सिंचनाखाली येणार असल्याची माहिती सरपंच सविता सुरेश तिकोणे यांनी दिली. सरपंच तिकोणे म्हणाल्या की, रानमळा परिसरास पिंपळगाव जोगे धरणाच्या डाव्या कालव्याचा लाभ मिळावा यासाठी पिंपळगाव जोगे डाव्या कालव्यावर सा. क्र. 47/250 येथील ओढ्यावर थेट विमोचक बांधून देण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे आमदार अतुल बेनके यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. माजी जि. प. सदस्य पांडुरंग पवार यांनी जलसंपदा विभागाकडे यासाठी पाठपुरावा केला. या प्रस्तावाला शासनाची मंजुरी मिळाल्याने रानमळा परिसरातील शेतीला पिंपळगाव जोगे कालव्याचा लाभ मिळणार आहे, असे तिकोणे यांनी सांगितले.