विश्रांतवाडीतील जादूटोण्याची घटना विकृत, अमानवी | पुढारी

विश्रांतवाडीतील जादूटोण्याची घटना विकृत, अमानवी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महिलेला मासिक पाळीच्या काळात आरामाची गरज असताना तिचे हातपाय बांधणे, रक्त जमा करण्यासाठी तिच्या शरीरासोबत छेडछाड करणे हे विकृत आणि अमानवी आहे. धर्माच्या नावाने व पैशाच्या प्रलोभनातून घडलेल्या या घटनेचा मासिक पाळीसाठी काम करणार्‍या समाजबंध संस्थेतर्फे निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी संस्थेतर्फे करण्यात आली आहे. या घटनेबद्दल नागरिकांमधूनही संताप व्यक्त होत आहे.

जादूटोण्यासाठी मासिक पाळीतील रक्त विकण्याचा प्रकार विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर उघडकीस आला आहे. सासरच्या मंडळींनी सुनेला पाळीतील रक्त जमविण्यास भाग पाडले व ते 50 हजार रुपयांना मांत्रिकाला विकले. सुनेचे हातपाय बांधून रक्त जमा करणे, या प्रकाराची तक्रार सामाजिक संस्थेच्या मदतीने महिलेने केली असून, सहभागी नातेवाइकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगानेही या घटनेचा निषेध केला आहे.

मासिक पाळीचा अशुद्धता, अपवित्रता किंवा पवित्रता याच्याशी कसलाही संबंध नसतो. कोणत्याही देशातील, जातीतील, धर्मातील गर्भाशय असणार्‍या प्रत्येक व्यक्तीला पाळी येते. त्याआधारे कोणतेही धार्मिक विधी करणे किंवा धार्मिक विधी करायला मज्जाव करणे, हे धर्माच्या नावाखाली केले जाणारे शोषण आहे. पाळीच्या रक्ताचा वापर करून जादू्टोणा करणे ही तर दुहेरी फसवणूक आणि दंडनीय गुन्हा आहे. पाळीच्या काळात महिलेला सकस आहार, पुरेसा आराम, स्वच्छता आणि सकारात्मक वागणूक मिळणे हा प्रत्येक महिलेचा मानवाधिकार आहे. या चारही बाबींचे उल्लंघन वरील प्रकारात घडले आहे.

                            – सचिन आशा सुभाष, समाजबंध संस्था

Back to top button