पुणे : प्रायोगिक नाटकांचेही महाराष्ट्रभर दौरे | पुढारी

पुणे : प्रायोगिक नाटकांचेही महाराष्ट्रभर दौरे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : व्यावसायिक नाटकांच्या जोडीला आता प्रायोगिक नाटकांचेही महाराष्ट्रभर दौरे होऊ लागले असून, गेल्या वर्षभरापासून विविध जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक नाटकांच्या दौर्‍यांचा ट्रेंड रुजू लागला आहे. पुणे, मुंबईसह आता कोकण विभाग, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सातारा, सांगली, धुळे, अमरावती अशा विविध जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक नाटकांचे दौरे होत असून, काही ठिकाणी तर खास प्रायोगिक नाटकांचे कट्टे सुरू करण्यात आले आहे. याद्वारे प्रायोगिक नाटकातील कलाकार, दिग्दर्शक आणि इतर तंत्रज्ञ प्रायोगिक नाटकांचे महोत्सव भरवित आहेत आणि महोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी प्रयोगांची संख्याही वाढत आहे.

प्रायोगिक नाटकांचा प्रेक्षकवर्ग फक्त पुणे, मुंबईपुरता मर्यादित आहे, असे बोलले जायचे. पण, आता विविध जिल्ह्यांमध्येही प्रायोगिकचा प्रेक्षकवर्ग तयार झाला असून, विविध ज्वलंत विषयांवर भाष्य करणारी प्रायोगिक नाटकेही आता बाहेरगावी पोचू लागली आहेत. त्यामुळे व्यावसायिक नाटकांच्या तुलनेत प्रायोगिक नाट्यनिर्मितीचे प्रमाण वाढले असून, नवीन नाटकांचीही त्यात भर पडत आहेत. म्हणूनच विविध ठिकाणच्या नाट्यमहोत्सवांसह नाट्य संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये प्रायोगिक नाटकांचे प्रयोग मोठ्या संख्येने होत आहेत. प्रायोगिक नाट्य संस्थांसाठी दौरे आयोजित करणे ही खर्चीक बाब असली, तरी जोखीम पत्करून त्या दौरे करू लागल्या आहेत.

याविषयी नाट्य दिग्दर्शक प्रभाकर पवार म्हणाले, कोरोनामुळे दोन ते तीन वर्षे प्रायोगिक नाटकांचे प्रयोग फारसे होऊ शकले नाहीत. पण, आता प्रायोगिक नाट्य संस्था राज्यभर आणि इतर राज्यांमध्येही प्रयोग हळूहळू होऊ लागले आहेत. हा ट्रेंड गेल्या वर्षभरापासून वाढला असून, नाट्य संस्थांकडून महिन्याला तीन ते चार प्रयोग बाहेरगावी शनिवारी आणि रविवारी आयोजित केले जात आहेत.

पुणे, मुंबईसह कोकण विभाग, कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर, अमरावती, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये प्रयोग होत आहेत. नाट्य संस्थांना दौरे करणे परवडणारे नाही. पण, तडजोड करीत ते प्रयोग करत असून, नाटकाचा विषय प्रेक्षकांपर्यंत पोचावा, या उद्देशाने ते ठिकठिकाणी प्रयोग करीत आहेत. राज्यभरातील नाट्य संस्था इतर जिल्ह्यांमध्ये प्रयोग करण्यासाठी पुढाकार
घेत आहेत.

  • पुणे, मुंबईसह आता कोल्हापूर, सातारा, सांगली, नागपूर जिल्ह्यांमध्ये होताहेत प्रयोग
  • नवीन प्रायोगिक नाटकांचेही प्रयोग सुरू विविध जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक नाटक कट्टे सुरू

नाट्यमहोत्सवांसह नाट्यविषयक कार्यक्रमांमध्ये प्रयोग होत आहेत. एका प्रयोगासाठी 40 ते 50 हजार खर्च येत असून, काही संस्था जोखीम पत्करून प्रयोग घेत आहेत. आम्ही दोन नाटकांचे प्रयोग ठिकठिकाणी करीत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद आहे.

                                           – राहुल लामखडे, कलाकार.

Back to top button