कोंढवा : साळुंखेविहार रस्त्यावर भाजी विक्रीस जागा द्या | पुढारी

कोंढवा : साळुंखेविहार रस्त्यावर भाजी विक्रीस जागा द्या

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा : साळुंखे विहार रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करीत आहोत. याबाबतचे ओळखपत्रेही महापालिकेने दिली असून, त्याचे रीतसर भाडे आम्ही भरत आलो आहेत. कोणतेही प्रलोभन न दाखविता आम्हाला या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा मोजून द्यावी, असा पवित्रा विक्रेत्यांनी घेतला आहे. वाहतुकीची समस्या उद्भवत असल्याने विक्रेत्यांनी नालागार्डन येथे व्यवसाय करावा, असे महापालिका प्रशासनाचे मत आहे.

कोंढवा-वानवडीच्या हद्दीवरील साळुंखे विहार रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी व दुकानदार, नागरिकांच्या तक्रारीवरून महापालिकेचे अतिक्रमण निरीक्षक गणेश तारू, पथ विक्रेते सदस्य शहनाज बागवान, सुलतान बागवान यांनी शुक्रवारी विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच, साळुंखे विहार रस्ता व नालागार्डनची पाहणी केली. गणेश तारू यांनी विक्रेत्यांना सांगितले की, साळुंखे विहार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून, त्याचा त्रास नागरिकांना व दुकानदारांना सहन करावा लागत आहे. यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी नालागार्डन येथे व्यवसाय करावा.

नालागार्डन या ठिकाणी प्रशासनाने भाजी मंडई सुरू केली असून, तिचे औपचारिक उद्घाटनही करण्यात आले आहे. या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले होते. मात्र, अद्याप कोणतीही सुविधा विक्रेत्यांना देण्यात आली नाही. यामुळे या ठिकाणी व्यवसाय करण्यास अडथळा येत आहे. यामुळे साळुंखे विहार रस्त्यावर व्यवसायासाठी जागा मोजून द्यावी, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली आहे.

ग्राहकांची मंडईकडे पाठ
नालागार्डन परिसरात साप, विंचू व अन्य किटकांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच विविध असुविधा असल्याने ग्राहकांनी या भाजी मंडईकडे पाठ फिरवली आहे. परवाना असणारे विक्रेते कमी असून, विनापरवाना व्यवसाय करणारे जास्त आहेत. त्यांचा बंदोबस्त केल्यास साळुंखे विहार रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होईल. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ, असे विक्रेत्यांनी सांगितले.

Back to top button