पुणे : पदपथांची दुर्दशा अन् खोदलेले रस्ते; नागरी समस्यांनी ग्रासला भोपळे चौक | पुढारी

पुणे : पदपथांची दुर्दशा अन् खोदलेले रस्ते; नागरी समस्यांनी ग्रासला भोपळे चौक

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वाढीव एफएसआय, घरमालक-भाडेकरू वादात जुन्या घरांचा रखडलेला पुनर्विकास, तुटक्या फरशांचे पदपथ, वाढती अतिक्रमणे, गळक्या जलवाहिन्या, भूमिगत वीजवाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते, पावसाळ्यात तुंबणार्‍या सांडपाणीवाहिन्या अशा अनेक नागरी समस्यांनी वॉर्ड क्रमांक तीन (भोपळे चौक) ग्रासला आहे. वॉर्डात बैठी घरे, चाळी असून, त्यांचा पुनर्विकास रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याशिवाय बोर्डाकडे निधी नसल्याने नियमित देखभाल-दुरुस्ती होत नाही. जाफरीन लेन परिसरातील फरशा तुटलेल्या आहेत. पाणीपुरवठ्याचे अनधिकृत कनेक्शन घेतलेल्यांना धो-धो पाणी, पण अधिकृत कनेक्शन घेणार्‍यांना पाणी मिळत नाही, अशी स्थिती आहे.

परिसरातील जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आलेल्या नाहीत. सांडपाणीवाहिन्यांची नियमित सफाई होत नाही. मवॉर्डात सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, बोर्ड प्रशासनाकडे दुर्लक्ष केले आहे. भोपळे चौकापासून केदारी रस्ता, जान महंमद रस्ता, कांबळे कोच हाउस, भीमपुरा, महात्मा गांधी रस्त्याचा काही भाग आणि कुरेशीनगर आदी परिसराचा समावेश होतो. या सर्व भागात अंतर्गत पदपथ हे फरशांचे असून, अनेक ठिकाणी फरशा फुटलेल्या आहेत. ते दुरुस्त करण्यासाठीही बोर्डाकडे निधी नाही.

वॉर्ड नंबर तीनमधील प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकार्‍यांनी जाणूनबुजून या भागाकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन वर्षांपासून बोर्डाचे कामकाज प्रशासकांकडे आहे. बोर्डाने उभारलेल्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला (एसटीपी) वॉर्डातील सांडपाणीवाहिन्या जोडल्या आहेत. पावसाळी वाहिन्यातून दुर्गंधी पसरते. दुरुस्तीअभावी पथदिवे चालू-बंद होत असतात. भीमपुर्‍यातील गल्ल्यांतील सांडपाणीवाहिन्यांची साफसफाई केलेली नाही,

                                                अबू सुफियान कुरेशी, स्थानिक रहिवासी

गेल्या दोन वर्षांपासून बोर्डावर ‘प्रशासकराज’ आहे. या काळात एकाही रुपयाचा विकास झाला नाही. जीएसटीचा परतावा मिळाला नाही. परिणामी, बोर्डाकडे कर्मचार्‍यांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत. दरम्यानच्या काळात कॅन्टोन्मेन्टचा नागरी भाग हा महापालिकेत समाविष्ट करण्याची चर्चा सुरू होती. त्यातच निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामागचा उद्देशच कळलेला नाही. तर दुसरीकडे अनेकांना मतदानाचा हक्क डावलण्यात
आला आहे.
                                                       -दिलीप गिरमकर, माजी सदस्य.

 

Back to top button