पुणे : लग्नात शिरून साऊंडच्या वायरींसह लॅपटॉपचे नुकसान

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लग्नसमारंभात सुरू असलेल्या साऊंड सिस्टीमच्या त्रासामुळे एकाने चक्क लग्नमंडपात प्रवेश करत साऊंड सिस्टीमच्या वायरी हातने ओढून लॅपटॉप फोडल्याचा प्रकार कोंढवा परिसरात घडला. महंमदवाडी येथील कोरियंथल रिसॉर्ट अॅन्ड क्लबमधील द ग्रॅन्ड बोल्डरुम येथे बुधवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सत्यबीर बंगा (रा. नॅती हायलॅन्ड सोसायटी, महंमदवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुल वाहाब रिसालदार (वय 54) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेच्या दिवशी द ग्रॅण्ड बोल्डरुम येथे किशोर मित्तल यांचे लग्न असल्याने साऊंड सिस्टीम सुरू होती. त्याच्या आवाजामुळे त्रास होत असल्याच्या रागातून बंगा लग्नसमारंभात हजर झाले. या वेळी, त्या ठिकाणी सुरू असलेल्या साऊंड सिस्टिमच्या वायरी हाताने जोरात ओढून काढून त्या तोडल्या. तसेच एल. ए. डी. ऑपरेटरचा लॅपटॉप आपटून फोडून दिपक मुंडदा यांचे अंदाजे दहा लाखांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे करीत आहेत.