एसटीच्या पुणे विभागात 410 गाड्या आयुर्मान संपलेल्या | पुढारी

एसटीच्या पुणे विभागात 410 गाड्या आयुर्मान संपलेल्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागातील आरटीओअंतर्गत नोंदणी झालेल्या 410 एसटी गाड्यांचे आयुर्मान संपले असून, केंद्र शासनाच्या आदेशानुसार त्या तातडीने भंगारात काढाव्यात, असे आवाहन आरटीओ कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या 31 मार्चपर्यंत राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमधील आयुर्मान संपलेली वाहने भंगारात काढण्याचे केंद्राचे आदेश होते. त्यानुसार आता परिवहन विभागामार्फत ही प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे पुणे विभागातील एसटीच्या आयुर्मान संपलेल्या 410 गाड्या भंगारात जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची आता धोकादायक गाड्यांपासून सुटका होणार आहे.

आरटीओने माहिती दिलेल्या 410 गाड्यांपैकी आता फक्त 21 गाड्या पुणे विभागात संचलनात आहेत. इतर गाड्या राज्यभरात प्रवासी सेवा पुरवत आहेत. त्यासुध्दा आरटीओने सांगितलेल्या प्रक्रियेनुसार भंगारात काढल्या जातील. त्याकरिता आम्ही इतर विभागांना पत्र पाठवून तेथील आरटीओ कार्यालयांमध्ये कार्यवाही करण्यास सांगितले आहे, असे एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.

 

Back to top button