पुणे : झेडपीच्या विद्यार्थ्यांना वाचताच येईना; ‘डायट’च्या पाहणीत धक्कादायक माहिती | पुढारी

पुणे : झेडपीच्या विद्यार्थ्यांना वाचताच येईना; ‘डायट’च्या पाहणीत धक्कादायक माहिती

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या 653 शाळांमधील वीस टक्क्यांहून कमी विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. गणिताची ओळख नाही. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेकडून (डायट) करण्यात आलेल्या क्रॉस तपासणीमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यामध्ये ‘निपुण भारत अभियान’ राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत 3 हजार 638 शाळांमध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु, साडेसहाशे शाळांच्या गुणवत्तेत कुठलाच बदल झाला नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील एक लाख 46 हजार 558 विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. 899 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यातील एक हजार 62 शाळांची गुणवत्ता चांगली असल्याचे अहवालात समोर आले आहे. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘निपुण भारत गुणवत्ता’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मुख्याध्यापकांना हे अभियान कशा पद्धतीने राबवायचे, याचे प्रशिक्षणही देण्यात आले होते.

इयत्ता 2 री ते 5 वीच्या विद्यार्थ्यांची 3 स्तरांत विभागणी करून हा उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर या उपक्रमाचा कितपत परिणाम झाला, यासाठी 22 ते 28 फेब्रुवारी या कालावधीमध्ये करण्यात आलेल्या तपासणीमध्ये शाळांच्या गुणवत्तेची माहिती पुढे आली. शाळांच्या गुणवत्तेत कुठलाच फरक पडला नसल्याने त्याच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. यापैकी अनेक शाळा दहा पटसंख्येपेक्षा कमी आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांची कायमस्वरूपी अनुपस्थिती आणि शिक्षकांची गैरहजेरी ही कारणे असू शकतात, असे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या शाळांमध्येच आदर्श शिक्षक…
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून काही दिवसांपूर्वी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण केले. 653 शाळांमध्ये गुणवत्तावाढ न झालेल्या सर्वाधिक शिक्षकांनाच ‘आदर्श’ पुरस्कार मिळाल्याने पुरस्कार निवडीच्या निकषावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, याबद्दल खुद्द जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले.

शाळांच्या गुणवत्ता सुधारणा न झालेल्या 45 केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना रविवारी जिल्हा परिषदेत बोलाविण्यात आले आहे. गुणवत्तेसंदर्भात त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणे हे महत्त्वाचे आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
                                              – आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

Back to top button