

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची आकर्षक सजावट करून पारंपरिक वेशभूषा केलेल्या महिलांनी पाळण्यात बाल शिवाजी ठेवून पाळणा म्हटला अन् पेढे वाटप करीत शिवजन्माचा आनंदोत्सव साजरा केला. कसबा पेठेतील लालमहालात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवजन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याखेरीज शहरासह उपनगरांमध्ये विविध सांस्कृतिक, स्पर्धा कार्यक्रम पार पडले. भव्य मिरवणुकांमुळे अवघे शहर भगवे झाले होते.शुक्रवारी (दि. 10) सायंकाळनंतर डीजेवर वाजल्या जाणार्या शिवरायांवरील गाण्यांनी परिसर दुमदुमून गेला होता.
डीजेच्या तालावर नाचण्यासाठी युवक-युवतींनी केलेली प्रचंड गर्दी हे शिवजयंतीचे वैशिष्ट्य ठरले. ढोल-ताशांसह डीजेमुळे शिवभक्तांमध्ये आनंदाला उधाण आले होते. आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, ढोल-ताशावादन, संबळवादन, टाळ-मृदंगवादन, फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरातील मंडळे लक्ष वेधून घेत होती. बहुतांश मंडळांनी वाजतगाजत मिरवणुका काढत जयंती साजरी केली. तर, विविध भागांमध्ये ढोल-ताशावादन करण्यात आले. यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' घोषणांनी परिसर दणाणून गेला. जनस्फूर्ती सेवा ट्रस्ट, प्रभात मित्रमंडळ, आपला मारुती मित्रमंडळ, श्री गणराज तरुण मंडळ यांसह विविध मंडळांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
लालमहाल येथे शिवजन्म
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने लालमहाल येते शिवजन्म साजरा करण्यात आला. या वेळी शाहीर जालिंदर शिंदे यांनी पाळणा गात उत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर 'शिवनेरीची अतूट गर्जना' हा पोवाडा सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जागा केला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी ते लालमहाल या बालपणीच्या जीवनप्रवासाचे सादरीकरण करण्यात आले. या वेळी शहराध्यक्षा वनिता वागसकर, राजेंद्र वागसकर, उपाध्यक्ष बाळ शेडगे, जयश्री पाथरकर, अस्मिता शिंदे, संगीता तिकोने यांसह पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिक उपस्थित होते.
नवजागृती मित्रमंडळ
नवजागृती मित्रमंडळाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे 'शिवकालीन शस्त्रगाथा' म्हणजेच महाराजांच्या काळात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन हिंदकेसरी विजेता पैलवान अभिजित कटके याच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनात शिवकालीन कालखंडातील मोघल, राजस्थानी रजपूत, पंजाबी असे विविध प्रांतातील शस्त्रे तसेच मराठ्यांच्या धोप तलवारी, वक्रतोफ आणि पट्टा गुर्ज अशा अनेक प्रकारची शस्त्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली होती. 'शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करूया' तसेच शिवकालीन इतिहासाविषयी नव्या पिढीला माहिती मिळावी, या हेतूने मंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
लोकसेवा प्रतिष्ठान
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक दुर्गमहर्षी कै. प्रमोद मांडे यांच्या प्रेरक विचारांतून महाराष्ट्रातील विविध शाळांतील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना ना नफा, ना तोटा तत्त्वावर रायगडदर्शन घडविण्याचा संकल्प लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. चिंचवड येथील गडकिल्ले सेवा संस्था याकामी साह्यभूत संस्था म्हणून काम करणार असल्याची माहिती अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी दिली. या संकल्पनेमागे नव्या पिढीत राष्ट्रप्रेम व देशभक्ती जागी व्हावी तसेच एक सशक्त विचारांची नवी पिढी देशासाठी तयार व्हावी, हाच उद्देश असल्याचे पायगुडे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
प्रभात मित्रमंडळाची मिरवणूक जल्लोषात
शिवमय वातावरणात शहराच्या पूर्व भागातील सर्वांत मोठा शिवजयंती सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवार पेठेतील प्रभात मित्रमंडळातर्फे आयोजित शिवजयंती उत्सवात पारंपरिक मिरवणूक सोहळा हे मुख्य आकर्षण ठरले. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नरवीर शिवा काशीद यांचे 13 वे वंशज आनंदराव काशीद, मंडळाचे अध्यक्ष किशोर चव्हाण, सचिव उदय वाडेकर, खजिनदार सचिन भोसले, उत्सवप्रमुख अविनाश निरगुडे, ओंकार नाईक आदी उपस्थित होते. मंडळाचे मंगेश शिंदे, उदय वाडेकर, संदीप नाकील, अक्षय चौहान, मनोज शेलार आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनात सहभाग घेतला. शिवजयंती उत्सवाचे यंदा 39 वे वर्ष आहे.
रथावरील शिवप्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर फुलांची उधळण करीत स्थानिक महिला व कार्यकर्त्यांनी मिरवणुकीचे स्वागत केले. या वेळी शंखनाद पथक, विनोद आढाव यांच्या कसबा पेठेतील र्त्यंबकेश्वर मर्दानी आखाडामधील कलाकारांनी सादर केलेले मर्दानी खेळ पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. तसेच जयनाथ मित्रमंडळ धनकवडीमधील ढोल-ताशा पथक व सोलापूर टेंभुर्णी येथील ओम श्री हलगी पथकाच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरला. अग्रभागी असलेल्या रथावर ऐतिहासिक नाटक सादर करण्यात आले.