बारामतीत लाचप्रकरणी दोघे जण ताब्यात | पुढारी

बारामतीत लाचप्रकरणी दोघे जण ताब्यात

बारामती; पुढारी वृत्तसेवा : शेतजमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठीचा प्रस्ताव बारामतीच्या प्रांत कार्यालयास पाठवून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून अडीच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली. त्यांना दि. 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. इंदापूर लघुपाटबंधारे विभागाचा कनिष्ठ अभियंता संदीप मारुती गोंजारी व खासगी इसम रणजित प्रकाशराव सूर्यवंशी (रा. इंदापूर) या दोघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील एका शेतकर्‍याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. संदीप गोंजारी याने तडजोडीअंती अडीच लाखांच्या लाचेची मागणी केली व त्यांच्या वतीने रणजित सूर्यवंशी यांनी ही रक्कम स्वीकारल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुरुवारी (दि. 9) रात्री उशिरा ही कारवाई केली.

बारामतीतील जळोची भागातील एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई केली गेली. पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे याबाबत तपास करीत आहेत. गोंजारी व सूर्यवंशी यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, वीरनाथ माने, पोलिस अंमलदार सौरभ महाशब्दे, अभिजित राऊत, प्रवीण तावरे यांनी केली.

Back to top button