कोथळे येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द | पुढारी

कोथळे येथील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द

बेलसर( पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोथळे येथील कल्याणी महिला बचत गट यांच्यातर्फे चालवण्यात येणार्‍या स्वस्त धान्य दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. बचत गटाच्या अध्यक्षा सीमा नामदेव भंडलकर (रा. कोथळे) यांच्या स्वस्त धान्य दुकान परवान्याची अनामत जप्त करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सुरेखा माने यांनी दिले आहेत.

तपासणीत कमी आढळून आलेला गहू 10.34 क्विंटल व तांदूळ 12.12 क्विंटल धान्याची चालू बाजारभावाप्रमाणे रक्कम भांडवलकर यांच्याकडून वसूल करून शासनाकडे जमा करण्याचा आदेश माने यांनी दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुरंदर तालुका अध्यक्ष तुषार ज्ञानेश्वर काकडे(रा. कोथळे) यांनी पुरवठा विभागाकडे या दुकानाबाबत तक्रार केली होती.

काकडे यांच्या अर्जानंतर नायब तहसीलदार व मंडल अधिकारी, जेजुरी यांनी कल्याणी महिला बचत गटाच्या दुकानाची तपासणी केली असता, त्यात विविध दोष आढळून आले. त्यामुळे या बचत गटाचा स्वस्त धान्य दुकान परवाना रद्द करण्यात आला. शिधापत्रिकाधारकांना सदर दुकानाकडून पावती देण्यात येत नव्हती. यासह इतर विविध तक्रारींवरून ही कारवाई करण्यात आली.

प्रशासनाच्या तपासणीत गंभीर स्वरूपाचे दोष आढळून आले. तसेच धान्याचा अपहार दिसून आल्याने सदर दुकानाचा परवाना रद्द करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी माने यांनी दिला. याबाबत तक्रारदार तुषार काकडे म्हणाले, की पुरंदर तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांमध्ये गैरप्रकार चालू आहेत. बहुसंख्य ठिकाणी पावत्या दिल्या जात नाहीत. याकडे
पुरवठा शाखेने गांभीर्याने लक्ष द्यावे.

Back to top button