कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू; निरा नदीच्या पुलावर दुर्घटना

निरा; पुढारी वृत्तसेवा : निरा गावच्या सीमेवर असलेल्या निरा नदीच्या पुलावर झालेल्या कंटेनर आणि मोटार सायकलच्या अपघातात पाडेगाव (ता. खंडाळा) येथील एकाचा मृत्यू झाला. मोटार सायकलस्वार कंटेनरच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अशोक रघुनाथ भोसले असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. 10) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला.
याबाबत प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाडेगाव (ता. खंडाळा) येथील आंबेडकर सोसायटी येथील अशोक रघुनाथ भोसले हे निरा (ता. पुरंदर) कडे येत होते. त्या वेळी लोणंदकडून एक कंटेनर येत होता. कंटेनर मोटारसायकलला ओव्हरटेक करीत असताना मोटारसायकलला धक्का लागला. त्यामुळे त्यांची मोटारसायकल पडली. या वेळी भोसले हेदेखील खाली पडले. त्यांचे डोके कंटेनरच्या चाकाखाली गेले. डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. लोणंद पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी लोणंद येथे पाठविण्यात आला आहे.