पुणे : आरटीई नोंदणीसाठी उरला एक आठवडा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांच्या पहिली आणि नर्सरीच्या प्रवेश प्रक्रियेला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. 1 मार्चपासून आतापर्यंत 2 लाख 4 हजार 866 पालकांनी आपल्या मुलांचे अर्ज भरले आहेत. नोंदणीसाठी अद्याप एक आठवडा शिल्लक असल्याने यंदा रेकॉर्डब्रेक नोंदणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) स्वयंअर्थसाह्यित, खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. संबंधित शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला दि. 1 मार्चपासून सुरुवात झाली.
पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी 17 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 828 शाळा असून, त्यामध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पुणे जिल्ह्यात 936 शाळांनी 15 हजार 655 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत. यासाठी तब्बल 46 हजार 560 बालकांचे अर्ज नोंदविण्यात आलेले आहेत.