पुणे: माथाडी कामगारांवर खोटे गुन्हे, नरेंद्र पाटील यांचा आरोप; उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार | पुढारी

पुणे: माथाडी कामगारांवर खोटे गुन्हे, नरेंद्र पाटील यांचा आरोप; उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागातील कंपन्या आपल्या स्वार्थासाठी माथाडी कामगारांच्या नेत्यांवर, युनियनच्या वादातून खंडणीचे खोटे गुन्हे दाखल करीत आहेत, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाविकास आघाडी सरकार असताना कोणाच्या तरी सांगण्यावरून अथवा चुकीच्या गोष्टी उघडकीस आणल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात काही लोक पोलिस यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात उघडकीस आला आहे.

पिंपरीमध्ये दोन जणांवर खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी गुन्हे दाखल केले आहेत, त्यांच्याकडे माथाडी फी भरण्याची सुमारे 50 लाखांची थकबाकी आहे. कोणाच्या तरी सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्याऐवजी पोलिसांनी आधी तपास केला पाहिजे, त्यानंतरच गुन्हे दाखल करावेत, असे पाटील म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिस महासंचालक यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Back to top button