पुणे: दोन चिमुरड्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे वाचली आजीची सोनसाखळी | पुढारी

पुणे: दोन चिमुरड्यांनी दाखविलेल्या धाडसामुळे वाचली आजीची सोनसाखळी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: शहरभरात दुचाकीस्वार चोरट्यांकडून सोनसाखळी हिसकाविण्याच्या घटनांचा आलेख कमी होत नाही. अशातच दोन चिमुरड्यांनी दाखविलेल्या धाडसाने सोनसाखळी चोरट्याला पळ काढावा लागला. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दुचाकीस्वार चोरट्याने जेष्ठ महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजीसोबत असलेल्या दोन्ही नातींनी चोरट्याचा प्रतिकार करीत त्याला मारहाण करीत पळवून लावले. नातींच्या कर्तृत्वाचे सीसीटिव्ही फुटेज सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर नातींचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. ऋत्वी घाग (वय 10) आणि ज्ञानेश्वरी घाग (वय 6) असे जिगरबाज चिमुरडींची नावे आहेत. याप्रकरणी लता नारायण घाग (वय 63, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्या तक्रार नोंदविली आहे.

फिर्यादी लता आणि त्यांच्या दोन नाती ऋत्वी आणि ज्ञानेश्वरी 25 फेबु्रवारीला रात्री आठच्या सुमारास मॉडेल कॉलनी परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्याने लता यांना मॉडेल कॉलनी कोठे आहे, अशी विचारणा केली. त्यावेळी पत्ता सांगत असताना चोरट्याने अचानकपणे लता यांच्या गळ्यातील 1 लाखांचे सोन्याचे गंठण हिसकाविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आजीने चोरट्याची गचांडी पकडून ठेवली. ऋत्वी आणि ज्ञानेश्वरीने जोरजोरात चोर -चोर अशी आरडाओरड केली. दोघीही चोरट्याच्या अंगावर धावून जात मारायला लागल्या. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याने सोन्याचे गंठण सोडून पळ काढला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे करीत आहे.

Back to top button