पुणे: कॉलेज तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, नंतर लग्न करण्यासाठी फिनेल पिऊन जीव देण्याची धमकी

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कॉलेज तरूणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार करत फिनेल पिण्याची धमकी देऊन लग्न करण्यास भाग पाडणार्या आणि चोरून काढलेले चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देणार्या एकावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित 19 वर्षीय तरुणीने पोलिसात तक्रार दिली असून नागेश चव्हाण (23,रा.आंबेगाव बुद्रुक) या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत तरुणी एका महाविद्यालयात शिक्षण घेते. आरोपी नागेश याने तरुणीशी ओळख वाढवली होती. यानंतर प्रेमाचा बहाणा करुन तिला पुणे- सातारा रस्त्यावर असलेल्या शितल लॉजमध्ये नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शरारिक संबंध ठेवत छुपे चित्रीकरण केले. यानंतर छायाचित्र आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची अशी धमकी देत पुन्हा अत्याचार केला. दरम्यान पीडित तरुणी शिकत असलेल्या महाविद्यालयाबाहेर जाऊन तिला लग्नाची मागणी केली. तीने लग्नास नकार दिल्यानंतर त्याने मी फिनेल पिऊन जीव देईल, अशी धमकी दिली. यानंतर पिडीत तरुणीला जबरदस्तीने सोलापूर येथे नेऊन तिच्याशी एका मंदिरात विवाह केला. दरम्यान तरुणीने वडिलांना भेटायचा बहाणा करुन पुन्हा पुण्यात घरी राहायला आली. यानंतर आरोपीने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली.