बेल्हे मंडल कृषी कार्यालयाला अधिकारी देता का?

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे कृषी मंडल कार्यालयात गेल्या 2 वर्षांपासून मंडल कृषी अधिकारी नियुक्त नाही. त्यामुळे परिसरातील शेतकर्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजनांपासूनदेखील वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे बेल्हे मंडल कृषी कार्यालयाला मंडल कृषी अधिकारी देता का? असे म्हणण्याची शेतकर्यांवर वेळ आली आहे.
राज्य शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकर्यांना खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषिपूरक साधने उपलब्ध होत असतात. तसेच शेतक-यांना वेळोवेळी कृषीविषयक मार्गदर्शन देण्याची व्यवस्था असते. शेतीची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, बेल्हे मंडल कार्यालयांतर्गत येणार्या गावांतील शेतकरी या योजनांपासून वंचित राहात आहेत.
बेल्हे मंडल कृषी कार्यालय हे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी बुद्रुक मार्गावर आहे. या कार्यालयाची जबाबदारी तालुका कृषी अधिकारी शिरसाठ यांनी आपल्या मर्जीतील कनिष्ठ दर्जा असलेल्या एका सहायक महिलेवर दिली असल्याने ती महिला सहायक पदाचे, सुपरवायझरचे तसेच मंडल कृषी अधिकारीपदाचे काम पाहात असल्याचे बोलले जाते.
या एकाच महिलेवर संपूर्ण मंडल कार्यालयाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे कृषी कार्यालय कधी उघडे आणि कधी बंद असते, हेच शेतकर्यांना समजत नाही. गेल्या 2 वर्षांपासून हे कार्यालय अपुर्या कर्मचार्यांअभावी बंद अवस्थेत पहावयास मिळत आहे. येथील काही कर्मचारी जुन्नर तालुका कार्यालयात बसून मंडळाचा कारभार हाकत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना कृषीविषयक मार्गदर्शन तसेच शासकीय योजनांची माहिती मिळत नाही.
यात शेतकर्यांना शेकडो रुपयांचा भुर्दंड सहन करून मनस्तापाशिवाय हाती काहीच लागत नाही. तर या कार्यालयात जाणारे काही मोजकेच लोक संबंधित महिलेकडून वारंवार योजनांचा लाभ कसे घेतात हा संशोधनाचा व चर्चेचा विषय आहे. दुसरीकडे या कार्यालयाचीदेखील दुरवस्था झालेली आहे. कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. पावसाळ्यात इमारतीचे छत अनेक ठिकाणी गळत असल्यामुळे या कार्यालयाची अवस्था ’असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
गेल्या 2 वर्षांपासून बेल्हे कृषी मंडलाधिकारी व कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे मागणी केलेली आहे. सध्या या कार्यालयाची जबाबदारी एका कार्यक्षम सहायक महिलेकडे दिली आहे. त्या महिलेचे काम अतिशय चांगले असून, मंडल कृषी कार्यालयातंर्गत कोणत्याही शेतक-याची तक्रार नाही.
– सतीश शिरसाठ, तालुका कृषी अधिकारी, जुन्नर