रावणगाव : रोख रकमेसह एटीएम मशीन सोडून चोरटे पळाले | पुढारी

रावणगाव : रोख रकमेसह एटीएम मशीन सोडून चोरटे पळाले

रावणगाव(दौंड); पुढारी वृत्तसेवा : सुपे (ता. बारामती) येथुन चोरट्यांनी ७ लाख १४ हजार रुपये रोकडसह चोरून आणलेले एटीएम मशीन पहाटेच्या सुमारास रावणगाव- बोरीबेल रस्त्यावरील गटारात टाकून चारचाकी वाहनासह पलायन केले. ग्रामस्थांच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस येऊन चोरीचा मोठा प्रयत्न फसला. शुक्रवारी (दि. १०) पहाटे सुपे येथिल इंडिकॅश कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने तोडून चारचाकी वाहनातून चोरट्यांनी चोरून आणले होते. पहाटेच्या सुमारास बोरीबेल घाटात बोलेरो गाडीतून चोरून आणलेले मशीन चोरटे गटारात लपवण्याचा प्रयत्न करत असताना ग्रामस्थांनी बघितले. त्यामुळे हे चोरटे तेथून पळून गेले.

रावणगाव येथील ग्रामस्थ कुमार चव्हाण, गणेश गावडे, बाळदत्त आटोळे यांनी या बाबतची खबर दौंड पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस हवालदार पांडुरंग थोरात, गोरख मलगुंडे, भागवत यांनी ते मशीन ताब्यात घेतले. हे मशीन रावणगाव पोलीस चौकी येथे आणले असता हा प्रकार बारामती तालुक्यातील सुपे येथे घडला असल्याचे समजले. यानंतर घटनास्थळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे, वडगाव पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे यांनी घटनास्थळी पाहणी करून दौंड पोलिसांच्या ताब्यातून एटीएम मशीन ताब्यात घेतले. चोरट्यांनी ते मशीन गॅस कटरने तोडून पूर्णपणे तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र मशीन न तुटल्याने त्यातील रक्कम तशीच राहिली. यामधून ५०० रुपयाची एक नोट बाहेर निघालेली होती

 दैनिक पुढारीच्या पत्रकाराचा तक्रारीबाबत पुढाकार

रावणगाव-बोरीबेल ग्रामस्थ पहाटेच्या सुमारास रस्त्यावरून चालत असताना ग्रामस्थांना वरील प्रकार लक्षात आला. रस्त्यावरच बोलेरो एमएच १२ अशी पासिंग असणारी गाडी थांबली होती व बाजूलाच गटारात तीन-चार जण एटीएम मशीन झाकत होते. ग्रामस्थांनी काहीतरी इलेक्ट्रिकल अवजड वस्तू आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले; मात्र हा प्रकार नऊ वाजेपर्यंत कोणीही पोलिसांना सांगितला नव्हता. ग्रामस्थ कुमार चव्हाण, गणेश गावडे व बाळदत्त आटोळे यांनी दैनिक पुढारीचे पत्रकार तानाजी गावडे यांना घेऊन याबाबतची कल्पना दौंड पोलिसांना दिली. चार तास रोकडसह रस्त्याच्या कडेलाच पडलेले एटीएम पोलिसांच्या स्वाधीन झाले.

Back to top button